तळेरे : आजच्या धकाधकीच्या काळात स्वसंरक्षणासाठी मुलींनी व महिलांनी कराटे कला आत्मसात करणे फार महत्त्वाचे आहे. कराटे कलेतून मन, बुद्धी आणि शरीराच्या विकासाबरोबरच स्वसंरक्षण होते. ही कला अवगत करणे काळाची गरज बनली आहे, असे प्रतिपादन कणकवली सभापती भाग्यलक्ष्मी साटम यांनी केले.पंचायत समिती कणकवलीच्या शेष फंडाअंतर्गत शालेय मुलींच्या स्वसंरक्षणासाठी कराटे प्रशिक्षणाच्या विद्यामंदिर लोरे येथील शुभारंभ कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून साटम बोलत होत्या.
साटम म्हणाल्या, मोबाईल व टीव्हीच्या जमान्यात आजच्या विद्यार्थ्यांचा शारीरिक व्यायाम फारच कमी होत आहे. ठराविक वयात शारीरिक व बौद्धिक विकासासाठी प्रत्येक मुलामुलींनी नियमित व्यायाम करावा. त्यासाठी पालकांनीही तितकेच आग्रही रहायला हवे. तरच मुलांच्या बौद्धिक विकासाबरोबर शरीराचा विकास योग्य होण्यास मदत होऊन निरोगी पिढी निर्माण होईल.
यावेळी माजी सभापती तथा लोरे शिक्षण संस्थेचे संस्थाध्यक्ष तुळशीदास रावराणे, पंचायत समिती सदस्य मनोज रावराणे, सुजाता हळदिवे, गटविकास अधिकारी मनोज भोसले, बालविकास प्रकल्प अधिकारी प्रणकुमार चटलावर, सरपंच अजय रावराणे, उपसरपंच नरेश गुरव, ग्रामसेवक उदय तेली, माजी सरपंच सुमन गुरव, मुख्यसेविका सकपाळ, कराटे प्रशिक्षण वर्गाचे प्रशिक्षक दत्तात्रय मारकड, लोरे हायस्कूलचे शिक्षक ए. पी. गोसावी आदी मान्यवर उपस्थित होते.उपस्थित मान्यवरांचे पंचायत समिती सदस्य तथा लोरे स्कूल कमिटी अध्यक्ष मनोज रावराणे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माजी सभापती तुळशीदास रावराणे यांनी भूषविले. सभापती भाग्यलक्ष्मी साटम यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून मुलींच्या कराटे वर्गाचा शुभारंभ करण्यात आला.यावेळी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना तुळशीदास रावराणे म्हणाले की, या विनामूल्य कराटे प्रशिक्षणाचा प्रत्येक मुलीने तन, मन, धनाने व एकाग्रतेने नियमित सराव करून अभ्यासाबरोबरच क्रीडाक्षेत्रातही नावलौकिक प्राप्त करावा. आजची मुले पूर्वीपेक्षा फारच बुद्धिमान व धाडसी आहेत.
या उपजत गुणांचा वापर योग्य ठिकाणी करण्याचे आवाहन करीत लोरे विद्यालयाला कराटे प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल पंचायत समिती कणकवलीला धन्यवाद दिले. लोरे विद्यालयातील विद्यार्थ्यांना सुलभ शौचालयाची कमतरता आहे याकरिता पंचायत समितीमार्फत काही विशेष प्रयत्न करावेत, अशी मागणीही त्यांनी करीत कराटे वर्गाला शुभेच्छा दिल्या.यावेळी पंचायत समिती सदस्य मनोज रावराणे यांनी महिलांची चूल आणि मूल संकल्पना कालबाह्य झालेली असून प्रत्येक क्षेत्रात महिला आपला वेगळा ठसा उमटवित आहेत, असे सांगून कराटेसारख्या स्वसंरक्षणाच्या कलेचा उत्तम सराव करून या कलेतच करिअर करण्याचे आवाहन केले.
यावेळी पंचायत समिती सदस्या सुजाता हळदिवे, गटविकास अधिकारी मनोज भोसले, कराटे प्रशिक्षक दत्तात्रय मारकड यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन विद्यालयाचे शिक्षक ए. पी. गोसावी यांनी केले. यावेळी शिक्षक एस. एम. वसावे, एस. के. कदम, पी. एल. साटम व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.