सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्गजिल्हा परिषदआरोग्य सभापतींच्या स्वत:च्या रेडी गावातच वैद्यकीय अधिकारी नसल्याची बाब झालेल्या आरोग्य समिती सभेत उघड झाली आहे. तर येथे डॉक्टर नसल्याने रुग्णांचे हाल होत असल्याने रेडी प्राथमिक आरोग्य केंद्र बंद करावे लागेल असे सांगण्याची वेळ खुद्द आरोग्य सभापती प्रितेश राऊळ यांच्यावर आली आहे आणि तसा इशाराही त्यांनी आरोग्य समिती सभेत दिला.जिल्हा परिषद आरोग्य समितीची सभा येथील बॅ. नाथ पै समिती सभागृहात सभापती प्रितेश राऊळ यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी समिती सचिव तथा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे, सदस्य शर्वाणी गांवकर, श्रीया सावंत, राजेश कविटकर, हरी खोबरेकर, जेरॉन फर्नांडिस, तालुका आरोग्य अधिकारी आदी खातेप्रमुख उपस्थित होते.वेंगुर्ले तालुक्यातील आडेली आणि रेडी प्राथमिक आरोग्य केंद्रात एकही वैद्यकीय अधिकारी नाही. त्यामुळे या ठिकाणी उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची गैरसोय होत आहे. त्यामुळे या ठिकाणी डॉक्टर द्यावा असे सांगण्याची वेळ खुद्द आरोग्य सभापती प्रितेश राऊळ यांच्यावर आली आहे. तसेच या ठिकाणी डॉक्टर न मिळाल्यास ही प्राथमिक आरोग्य केंद्रे बंद करण्याची वेळ आली असून डॉक्टर न मिळाल्यास ही केंद्रे बंद करू असा इशारा आरोग्य अधिकाऱ्यांना दिला.
यावर जिल्ह्यात अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये डॉक्टर उपलब्ध नाहीत. त्यामुळे तेथे आरोग्य सुविधा देण्याचा प्रभारी चार्ज नजीकच्या आरोग्य केंद्रातील डॉक्टरांकडे देण्यात आला आहे. तसेच शासनाकडून नव्याने डॉक्टर उपलब्ध होताच संबंधित ठिकाणी डॉक्टर प्राधान्याने दिला जाईल, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे यांनी आरोग्य समिती सभेत दिली.हॉटेल किंवा मंगल कार्यालये सुरु करताना त्यांना आरोग्य विभागाचा ना हरकत दाखला घ्यावा लागतो. मात्र, एकदा हा दाखला घेतल्यानंतर त्याची पुनर्नोंदणी केली जात नाही. संबंधित व्यावसायिक व्यवसाय वाढल्याने बांधकाम वाढवितात. त्यामुळे आरोग्य विभागाच्या या ना हरकत दाखल्याची पुनर्नोंंदनी करण्याचा निर्णय जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत घेण्यात यावा, असे यावेळी प्रशासनाने सांगितले. यातून जिल्हा परिषदेचे स्वउत्पन्न वाढेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला. यानंतर सभागृहाने याबाबत नियोजन करून पुढील सभेत प्रस्ताव ठेवावा, असे आदेश दिले.आयुष अंतर्गत रेडी येथे पंचकर्म केंद्र उभारण्यात यावे यासाठी आरोग्य समितीने मागणी केली होती. मात्र, हा प्रस्ताव केंद्राच्या आयुष विभागाने फेटाळून लावला असे आयुष अधिकारी सांगत आहेत. हा प्रस्ताव घेऊन आपण आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांना भेटलो होतो. त्यावेळी त्यांनी तयारी दर्शविली होती.
त्यामुळे जर केंद्राने हा प्रस्ताव फेटाळला असेल तर त्याची प्रत आपल्याला देण्यात यावी, अशी मागणी मी गेले सात-आठ महिने करीत आहे. परंतु, आयुष विभागाचे अधिकारी ती प्रत न देता आपली दिशाभूल करीत आहेत, असा आरोप यावेळी आरोग्य सभापती प्रितेश राऊळ यांनी केला. तसेच दिशाभूल करणाऱ्या आयुषच्या अधिकऱ्यांची आरोग्य मंत्र्यांकडे तक्रार करण्याच्या सूचना देत तसा ठरावही आरोग्य समिती सभेत घेण्यात आलाअठराठिकाणी आरोग्य पथके तैनातगणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला असून हा उत्सव साजरा करण्यासाठी मुंबई, पुणे आदी ठिकाणांवरून चाकरमानी जिल्ह्यात दाखल होणार आहे. मात्र, त्यांच्याकडून जिल्ह्यात कोणत्याही साथीचा अथवा रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी जिल्ह्यात बस स्थानक, रेल्वे स्टेशन आदी महत्त्वाच्या व गर्दीच्या १८ ठिकाणी आरोग्य पथके तैनात करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी सभेत देण्यात आली.