कणकवली : सिंधुदुर्ग जिल्हा हा क्रीडा क्षेत्राबरोबरच सर्व क्षेत्रात अग्रेसर आहे. या जिल्ह्यात कबड्डीसारख्या खेळाचा वारसा अविरतपणे सुरू असून यापुढेही तो सुरू रहावा यासाठी कुणाल बागवे मित्रमंडळासारखी मंडळे कार्यरत आहेत. हे निश्चितच कौतुकास्पद आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडूंनी चांगल्या खेळाचे प्रदर्शन करीत खिलाडूवृत्तीचे दर्शन घडवावे, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक संजयकुमार बावीस्कर यांनी केले.येथील विद्यामंदिर हायस्कूलच्या पटांगणावर गुरुवारी रात्री कुणाल बागवे स्मृती राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर, प्रांताधिकारी संतोष भिसे, नगराध्यक्षा अॅड. प्रज्ञा खोत, अवधूत मालणकर, राजन वराडकर, नगरसेविका मेघा गांगण, माधुरी गायकवाड, रुपेश नार्वेकर, कन्हैया पारकर, विशाल डामरी, नागेश मोरये, गौरव हर्णे, संजय मालंडकर आदी उपस्थित होते.संजय बावीस्कर म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्हा हा कला-क्रीडा तसेच साहित्याचा पूजक आहे. येथे अनेक गुणवंत खेळाडू असून त्यांनी जिल्ह्याबरोबरच राज्याचे नाव उज्ज्वल केले आहे. खेळाडूंना नामवंत खेळाडूंचा खेळ पाहण्याची संधी या स्पर्धेच्या निमित्ताने प्राप्त झाली आहे.संतोष भिसे म्हणाले, कोणत्याही उपक्रमात सातत्य राखत तो चालू ठेवणे कठीण असते. ही कठीण जबाबदारी या मंडळाने आपल्या खांद्यावर घेतली आहे. अशाच पद्धतीने विविध उपक्रम राबवून या मंडळाने आपले समाजोपयोगी कार्य सुरू ठेवावे तसेच भविष्यात या मैदानावरून राज्यस्तरावरील खेळाडू निर्माण व्हावेत, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.स्पर्धेच्या उद्घाटनानंतर झालेल्या कबड्डी सामन्यातील खेळाडूंनी केलेल्या उत्कृष्ट खेळाच्या प्रदर्शनाने रसिकांना खिळवून ठेवले. कबड्डी रसिकांना स्पर्धा पाहण्यासाठी गॅलरीची व्यवस्था करण्यात आली आहे. (वार्ताहर)स्पर्धेतून मिळतो नवा आत्मविश्वासकुणाल बागवे मित्रमंडळाची कबड्डी स्पर्धा म्हणजे दिवंगत युवा कार्यकर्त्यांना वाहिलेली आदरांजली आहे. या स्पर्धेतून नव्या आशा आणि आत्मविश्वास आपल्याला मिळतो. म्हणूनच ही स्पर्धा प्रतिवर्षी आयोजित केली जात असल्याचे संदेश पारकर यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले.
‘सिंधुदुर्ग’ क्रीडा क्षेत्रात अग्रेसर
By admin | Published: February 13, 2015 9:51 PM