सिंधुदुर्ग : मालवण तालुक्यातील तारकर्ली येथील पर्यटन विकास महामंडळाच्या अखत्यारीत असलेल्या सिंधुकन्या या हाऊसबोटीला काही दिवसांपूर्वी भलेमोठे छिद्र पडले. याकडे एमटीडीसी प्रशासनाकडून दुर्लक्ष झाल्याने आजही ही पर्यटकांच्या सेवेतील हाऊसबोट तारकर्ली खाडीपात्रात शेवटच्या घटका मोजत आहे.हाऊसबोटीमध्ये पडलेल्या छिद्रातून मोठ्या प्रमाणात पाणी शिरत असल्याने बोटीतील लाखो रुपये किंमतीच्या साहित्याचे नुकसान झाले. या बोटीतील पाणी उपसा करण्याचे एमटीडीसीकडून शर्तीचे प्रयत्न सुरु असून अद्यापही यश आलेले नाही.आरामदायी पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी देशी विदेशी पर्यटक आॅनलाईन पद्धतीने या हाऊसबोटचे बुकिंग करत असतात. पर्यटकांच्या सेवेसाठी दोन रूम असतात. बोट आलिशान व आकाराने मोठी असते. बांबू मॅट्स काठ्या, लाकूड, सुपारीची झाडे यांचा उपयोग छतासाठी, जमिनीसाठी काथ्याच्या चटया, लाकडी फळ्या आणि नारळाच्या झाडाचे लाकूड आणि काथे पलंगासाठी वापरले जातात.लाईटसाठी सोलर पॅनलचा वापर केला जातो. हाऊसबोटमध्ये सर्व सुखसोयी असतात. यामध्ये फर्निश्ड बेडरूम, आधुनिक टॉयलेट, आरामदायक दिवाणखाने, स्वयंपाकघर आणि बाल्कनीसुद्धा असते. मालवण किनाऱ्यांवरील तारकर्ली येथील शेवटच्या घटना मोजणाऱ्या हाऊसबोटची किंमत दीड कोटी रुपयांच्या घरात आहे. एमटीडीसी प्रशासनाच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अधिकारी वर्गाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे.हाऊसबोटला लिकेज झाल्याने ती काही दिवसांपूर्वी तारकर्ली जेटीवर आणून ठेवण्यात आली होती. योग्यप्रकारे दुरुस्ती वेळेत न करण्यात आल्याने संपूर्ण बोटीत खाडीचे पाणी घुसून बोट नुकसानग्रस्त झाल्याचा आरोप या परिसरातील ग्रामस्थांनी केला आहे. तर या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषी अधिकारी वर्गावर कारवाई करण्याची मागणी माजी सरपंच डॉ. जितेंद्र केरकर व तारकर्ली ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आली आहे.
वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या टीमला पाचारण : कांबळेएमटीडीसीच्या वरिष्ठ अधिकारी टीमला पाचारण करण्यात आले असून त्यांच्या सूचनेनुसार पुढील कार्यवाही केली जाणार असल्याची माहिती तारकर्ली एमटीडीसी व्यवस्थापक एस. ए. कांबळे यांनी दिली आहे. तर बोट पाण्याबाहेर काढण्यासाठी बंदर विभागाचीही मदत घेतली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
अन्य तीन हाऊसबोटीही बंदावस्थेतसिंधुकन्या हाऊसबोट खाडीच्या पाण्यात बुडाली. या बोटीतील इंजिन, एसी, टीव्ही यासह अन्य किमती वस्तू निकामी झाल्याची भीती व्यक्त होत आहे. पर्यटन महामंडळाने स्थानिकांची मदत घेत बोटीला पाण्याबाहेर काढण्याचे प्रयत्न सोमवारी सुरू केले. मात्र, बोटीत पूर्ण पाणी भरल्याने यश प्राप्त झाले नाही.
सिंधुकन्या ही हाऊसबोट २०१२-१३ साली तारकर्ली एमटीडीसीच्या ताफ्यात पर्यटन सेवेसाठी दाखल झाली होती. तारकर्ली खाडी परिसरात सिंधुकन्या बोटीसह सावित्री, हिरण्यकेशी व कर्ली या तीन हाऊसबोट सेवेत होत्या. मात्र सुधारणा व दुरुस्तीच्या नावाखाली हिरण्यकेशी व कर्ली या हाऊसबोट वर्षभरापूर्वी खाडी किनाºयावर ठेवण्यात आल्या आहेत. मात्र त्यांची कोणतीही दुरुस्ती झालेली नाही.