सिंधुदुर्गनगरी : देवगड ब्राह्मणदेववाडी येथील नीता बापट यांच्या घरातील सोन्याचे मंगळसूत्र, रोख रक्कम आणि मोबाईल चोरणाऱ्या चोरट्याच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला यश आले. मोहन जानू ठाकरे (३५, रा. ब्राह्मणदेववाडी-देवगड) असे संशयिताचे नाव असून त्याला कणकवली बसस्थानक परिसरातून ताब्यात घेतले आहे. ठाकरे याने गुह्याची कबुली दिली असून चोरीला गेलेला मुद्देमाल त्याच्याकडून हस्तगत करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक विश्वजित कार्इंगडे यांनी दिली.२३ मे २०१७ रोजी मध्यरात्रीनंतर देवगड ब्राह्मणदेववाडी येथील बापट यांच्या घराच्या खिडकीतून कोणीतरी हात घालत पर्समधील सोन्याचे मंगळसूत्र, डूल, २५ हजार रुपयांची रोख रक्कम तसेच एक मोबाईल असा ४६ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याची तक्रार नीता बापट (४१) यांनी देवगड पोलीस ठाण्यात दिली होती. या तक्रारीनुसार अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या तपासाकरिता स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे एक पथक तैनात केले होते. या पथकाने देवगड येथे जाऊन गुन्ह्याचा सतत पाठपुरावा केला होता. या गुन्ह्याच्या अनुषंगाने हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगार, भंगारवाले यांची तपासणी करण्यात आली होती. हे करीत असताना शुक्रवारी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजित कार्इंगडे यांना त्यांच्या खबऱ्यांमार्फत देवगड तालुक्यातील एक व्यक्ती कणकवली बाजारपेठेतील एका सुवर्णकाराच्या दुकानात सोन्याचे दागिने विक्रीकरिता येणार असल्याची माहिती मिळाली होती.त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे एक पथक कणकवली येथे रवाना झाले होते. हे पथक कणकवली बाजारपेठ व आजूबाजूला शोध घेत असताना कणकवली बसस्थानक येथे पोलीस निरीक्षक विश्वजित कार्इंगडे यांनी सागितल्याप्रमाणे एक व्यक्ती सापडली. त्याला त्याचे नाव विचारले असता त्याने मोहन जानू ठाकरे, वय ३५ वर्षे, रा. ब्राह्मणदेववाडी, ता. देवगड असे सांगितले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे सोन्याचे मंगळसूत्र व डूल असे दागिने मिळून आले.या दागिन्यांबाबत त्याच्याकडे विचारपूस केली असता ठाकरे याने उडवाउडवीची उत्तरे दिली. म्हणून पथकातील पोलिसांनी त्यास अधिक विश्वासात घेऊन सविस्तर तपास केला असता त्याने ब्राह्मणदेववाडी, (ता. देवगड) येथे राहणारे बापट यांच्या घराच्या खिडकीतून हात घालून चोरी केली असल्याचे कबूल केले.सततच्या पाठपुराव्यामुळे गुन्हा उघडकीससतत पाठपुरावा करीत राहिल्याने हा गुन्हा उघडकीस आला. पोलीस निरीक्षक विश्वजित कार्इंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकातील पोलीस हवालदार गुरुनाथ कोयंडे, पोलीस नाईक संतोष सावंत, पोलीस शिपाई संकेत खाडये, रवि इंगळे, ज्ञानेश्वर कांदळगावकर, स्वाती सावंत यांनी ही कारवाई केली.
या कामगिरीबाबत त्यांचे जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम व अप्पर पोलीस अधीक्षक प्रकाश गायकवाड यांनी कौतुक करुन त्यांना पारितोषिक जाहीर केले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक विश्वजित कार्इंगडे यांनी दिली.