गावाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; विकास प्रक्रियेला गती येणार
वैभववाडी : आजवर अनेक पुरस्कारांनी सन्मानित मांगवली ग्रामपंचायतीला आयएसओ मानांकन मिळाले आहे. त्यामुळे गावाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून आयएसओ मानांकन प्राप्त करणारी वैभववाडी तालुक्यातील मांगवली ही पहिली ग्रामपंचायत ठरली आहे. आयएसओमुळे ग्रामपंचायतीचा प्रशासकीय कारभार आणि गावाच्या विकास प्रक्रियेची गती वाढण्यास मदत होणार आहे.शासननियुक्त संस्थेमार्फत दोन महिन्यांपूर्वी तालुक्यातील ग्रामपंचायतींची आयएसओसाठी तपासणी झाली होती. त्यामध्ये ग्रामपंचायतीची सुसज्ज इमारत, अद्ययावत कार्यालय, उत्कृष्ट बांधकाम, आपले सरकार सेवा केंद्राचा प्रभावी वापर, शौचालये, स्वच्छता, मालमत्तेचे विवरण, १ ते ३३ लेखांचे अद्ययावीकरण, दैनंदिन लेखे, भौतिक सुविधा, गुणवत्ता धोरण, आतापर्यंत मिळविलेले पुरस्कार या बाबी तपासण्यात आल्या होत्या. त्यानुसार शासनास प्राप्त अहवालानुसार तालुक्यातून मांगवली ग्रामपंचायतीची शिफारस केली गेली होती.शासकीय योजनांची अंमलबजावणी, पायाभूत भौतिक सुविधा, कर वसुली आणि महसूल वाढीसाठी झालेले प्रयत्न, त्याचबरोबर कारभारातील पारदर्शकता या बाबी विचारात घेऊन क्वॉलिटी रिसर्च आॅर्गनायझेशन या जागतिक स्तरावर गुणवत्ता धोरण राबविणाऱ्या संस्थेने मांगवली ग्रामपंचायतीला आयएसओ मानांकन दर्जा जाहीर केला आहे.हा दर्जा पुढील तीन वर्षे राहणार असून शासनाची अभियाने, स्पर्धांमध्ये गुणांकनात ग्रामपंचायतीला आयएसओचा फायदा होणार आहे. त्याचबरोबर दप्तर दिरंगाई कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच नव्या योजनांचा लाभ देताना प्रशासनाला मानांकनाचा प्राधान्याने विचार करणे बंधनकारक राहणार आहे.मांगवली ग्रामपंचायतीने आतापर्यंत निर्मलग्राम, तंटामुक्त गाव पुरस्कार, स्वच्छग्राम पुरस्कार, पर्यावरण समृद्ध ग्राम असे विविध पुरस्कार पटकावले आहेत. त्यामध्ये आयएसओ मानांकनाची भर पडल्याने ग्रामपंचायतीची जागतिक स्तरावर नोंद होऊन वेगळी प्रतिमा तयार होण्यास मदत होणार आहे. त्यामुळेच सरपंच राजेंद्र राणे, उपसरपंच संतोष ईस्वलकर, ग्रामसेवक उमेश राठोड, सदस्य व ग्रामस्थांचे तालुक्यात अभिनंदन केले जात आहे.आयएसओमुळे कारभार होणार गतिमानगुणवत्ता व्यवस्थापन प्रणालीच्या रचनेत किंवा कागदपत्रात साचेबद्धपणा आणणे तसेच नागरिकांच्या गरजा सुनिश्चित करून त्यांची पूर्तता करणे हा या मानकाचा उद्देश आहे. आयएसओ मानांकनामुळे ग्रामपंचायतीच्या कामात गतिमानता येऊन ते सुरळीत पार पाडण्यास मदत होणार आहे. त्यामुळे ग्रामस्थांना वेळेत सेवा मिळणे सुलभ झाले आहे.
ग्रामस्थांच्या सनदीप्रमाणे वेळेत सर्व दाखले मिळण्यास मदत होणार आहे. विविध योजनांची माहिती ग्रामस्थांपर्यंत प्रभावीपणे पोहोचून जास्तीत जास्त योजनांचा लाभ मिळवून देणे सोयीस्कर ठरणार आहे.