प्रथमेश गुरव सिंधुदुर्ग : पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यासाठी शासनाने मासेमारी बंदी लागू केली आहे. या मासेमारी बंदीमुळे वेंगुर्ले येथील समुद्रकिनारी मच्छिमारी ट्रॉलर्स विसावले आहेत.
सुमारे दोन महिने मासेमारी व्यवसाय आता बंद राहणार आहे. पावसाळ्याच्या कालावधीत दैनंदिन रोजगारासाठी खाडीतील मासेमारी सुरू राहणार असून मत्स्य खवय्यांसाठी या मासेमारीला आता जोर चढणार आहे.जून, जुलै या महिन्यात मत्स्यबीज निर्मिती होते. तसेच पाऊस व वादळी हवामानामुळे जीवितहानी होण्याचा धोका असल्याने शासन या कालावधीत मासेमारी बंदी लागू करण्याचा निर्णय घेते. त्यानुसार यावर्षी १ जून ते ३१ जुलै या कालावधीत शासनाने मासेमारी बंदी लागू केली आहे.
मासेमारी बंदीला आता सुरुवात झाली आहे. पावसाच्या पाण्याने भिजून ट्रॉलर्सचे नुकसान होऊ नये या उद्देशाने माडाची झापे व प्लास्टिकच्या सहाय्याने ट्रॉलर्स किनाऱ्यावर सुरक्षित ठिकाणी ठेवले जात आहेत.शासनाने सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून जाहीर केला. पर्यटनातून रोजगार निर्मितीसाठी अनेक प्रकल्प राबविले गेले. वेंगुर्ल्यात स्वच्छ किनारपट्टी, चांगली हवा असल्याने याठिकाणीही पर्यटक येतात. जर शासनाने मच्छिमारांच्या बोटींग लायसन्स, निवास न्याहारीबाबत लागणाऱ्या प्रक्रियेत काही प्रमाणात सवलत दिल्यास येथील मच्छिमारही निवास न्याहारीमार्फत आपला पर्यायी व्यवसाय निवडू शकतो.वेंगुर्ले किनारपट्टीवर २०१७-१८ या वर्षात मासेमारी करताना मच्छिमारांना बऱ्याच समस्या आल्या. त्या समस्यांबाबत शासनाने विचार करणे आवश्यक आहे. किनाऱ्यांवर मच्छिमारी करताना अनेक समस्यांमुळे मच्छिमारीवरही परिणाम जाणवला. मासेमारीसाठी लागणारे जाळे, डिझेल, रॉकेल, बोटीची डागडुजी, खलाशांची मजुरी आदी खर्च वगळता यावर्षी झालेल्या एकूण मासेमारी व्यवसायातून वर्षभराची गुजराण करणे यावर्षीही अवघड होणार आहे.
पर्यटकांसाठी निवास न्याहारी योजनाआम्ही आमच्या स्वामिनी बचतगटाच्या माध्यमातून मांडवी किनारी येणाऱ्या पर्यटकांसाठी न्याहारी योजना राबवित आहोत. यामध्ये पर्यटकांना भारतीय संस्कृतीनुसार अगदी सर्वसामान्यांना परवडेल अशा दरामध्ये पारंपरिक खाद्यपदार्थ उपलब्ध करून देतो. यामध्ये शिरवाळे, मोदक, आंबोळी, घावणे तसेच ताजी मच्छी यांचा समावेश आहे. या सर्व खाद्यपदार्थांना पर्यटकांची चांगली पसंती आहे. फक्त यासाठी पर्यटकांनी पूर्व कल्पना देणे गरजेचे असते. या आमच्या न्याहारी उपक्रमामुळे येथील ८ महिलांना रोजगार उपलब्ध झाला असून पर्यटकांनाही स्थानिक खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येत आहे- श्वेता हुले, अध्यक्षा, स्वामिनी महिला बचतगट, वेंगुर्ले
मासेमारी हंगाम आता दोन महिन्यांच्या सुटीनंतर सुरू होणार असल्याने वेंगुर्ले समुद्र किनारपट्टीलगत मच्छिमारी ट्रॉलर्स विसावले आहेत.