सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील फोटो स्टुडिओ लक्ष्य करणारा मास्टरमाईंड महेंद्र बामा अवचटकर (३४, रा. महाजनी-मल्यानी ता-अलिबाग-रायगड) या संशयित आरोपीची मंगळवारी सहा दिवसांची पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर आज कणकवली न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने अवचटकर याला ९ जूनपर्यंत पुन्हा पोलीस कोठडी सुनावली आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाच चोऱ्यांमध्ये समावेश असलेल्या संशयित महेंद्र्र अवचटकर याच्या पोलीस प्रशासनाने मुसक्या आवळल्या होत्या. पोलीस अधीक्षक दिक्षीतकुमार गेडाम यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने रोहा रायगड येथून ३० मे रोजी मध्यरात्री अटक केली होती. त्यानंतर चोरी प्रकरणाचा संपूर्ण तपास करण्याची मालवण पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक अमोल साळुंखे यांच्याकडे देण्यात आली होती.
मुख्य संशयिताच्या मुसक्या आवळल्यानंतर चोरीस गेलेला साडेपाच लाख रुपयांचा मुद्देमाल व साहित्य जप्त करण्यात आले होते. व उर्वरित तीन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यासाठी मालवण पोलीस कसून प्रयत्न करत आहेत.आतापर्यंत चोरीस गेलेल्या साहित्यापैकी ८० टक्के मुद्देमाल जप्त करण्यात आला असून अवचटकर याच्याकडून चोरीचा माल विकत घेणाºया अन्य तिघांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.
यात निलेश शशिकांत म्हात्रे, वैभव मधुकर तुरे (२१, फोटोग्राफर) यांना देवगड न्यायालयाने ६ जून तर रोहन प्रकाश पाटील (२१, मोबाईल शॉपी चालक), याला कुडाळ न्यायालयाने ७ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी अधिक तपास मालवण पोलीस करीत आहेत.