कणकवली : मुंबई - गोवा महामार्ग चौपदरीकरण कामामुळे सर्वत्र धुळीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे वाहनचालक तसेच पादचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याकडे प्रशासन तसेच शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कणकवली येथील अप्पासाहेब पटवर्धन चौकात शुक्रवारी नागरिकांना मोफत मास्क वाटले. तसेच जोरदार घोषणाबाजी करीत शासनाचा निषेध केला.मनसेचे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी महामार्ग चौपदरीकरण कामामुळे नागरिकांना त्रास होत असल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. तसेच या समस्येकडे कोणीच लक्ष देत नसल्याने शासनाचा निषेध करण्यासाठी शहरातील पटवर्धन चौकात नागरिकांना मोफत मास्क वाटप करुन आगळे वेगळे आंदोलन मनसे करणार असल्याचे जाहिर केले होते.
त्या अनुषंगाने शुक्रवारी कणकवलीत आंदोलन करण्यात आले. यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष राजन दाभोलकर, मनविसे उपजिल्हाध्यक्ष अनिल राणे, कणकवली तालुकाध्यक्ष दत्ताराम बिडवाडकर, उपतालुकाध्यक्ष गुरू भालेकर, शहराध्यक्ष शैलेंद्र नेरकर, संतोष कुडाळकर, देवगड तालुकाध्यक्ष मयूर मुणगेकर, प्रभाकर राणे, अजय मालवणकर, शरद सावंत आदी उपस्थित होते.यावेळी ' पालकमंत्री हाय हाय', 'युती शासनाचा धिक्कार असो' अशा घोषणा मनसेच्या कार्यकर्त्यांनी दिल्या. तसेच महामार्ग चौपदरीकरण कामामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांचे तातडीने निराकारण करावे. अन्यथा मनसेला तीव्र आंदोलन करावे लागेल.असा इशाराही यावेळी दिला.