सिंधुदुर्ग : एनईईटी व जेईई परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी कोचिंग क्लासमध्ये लाखो रुपयांचे शुल्क आकारले जात असतानाच, भाजपचे आमदार अॅड. निरंजन डावखरे यांच्या समन्वय प्रतिष्ठान'ने गुणवंत विद्यार्थ्यांना वर्षभरासाठी मोफत प्रशिक्षण देण्याचा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरु केला आहे.
कोकणातील सर्व पाच जिल्ह्याच्या ठिकाणी प्रवेश परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेबाबत नावनोंदणीसाठी 5 नोव्हेंबरपर्यंत 022-25304005 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन आमदार डावखरे यांनी केले आहे.एनईईटी व जेईई परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी गरीब पालकांच्या मुलांना कोचिंग क्लासचे शुल्क परवडत नाही. त्यामुळे क्षमता असूनही गुणवंत मुले या परीक्षांपासून दूर राहतात. म्हणून समन्वय प्रतिष्ठानच्या वतीने गुणवंत मुलांना वर्षभर मोफत निवासी प्रशिक्षणाचे दालन खुले करण्यात आले, असे कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजपचे आमदार व प्रतिष्ठानचे अध्यक्ष अॅड. निरंजन डावखरे यांनी सांगितले.
पालकांचे उत्पन्न दीड लाख रुपयांपेक्षा कमी असावे, सध्या विद्यार्थी बारावी विज्ञान शाखेत असावा, त्याला दहावीत गणित व विज्ञानात 70 टक्के गुण असावेत, तो सरकारी वा अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी असावा आदी अटी ठेवण्यात आल्या आहेत.
गुणवंत विद्यार्थ्यांची ठाणे, पालघर, पेण, रत्नागिरी आणि कणकवली येथे प्रवेश परीक्षा घेतली जाईल. पात्र विद्यार्थ्यांची वर्षभराच्या निवासी प्रशिक्षणासाठी निवड केली जाईल. या योजनेतून शिक्षण घेण्यासाठी पालकांना काहीही खर्च येणार नाही, असे आमदार डावखरे यांनी सांगितले.