सिंधुदुर्गनगरी : शालेय पोषण आहार शिजवून देणाऱ्या स्वयंपाकी महिलांचे शोषण करण्याची पातळी शिक्षण विभागाने ओलांडली आहे असा आरोप करत या विरोधात आंदोलन करण्याचा निर्णय सामाजिक शालेय पोषण आहार स्वयंपाकी संघाने घेतला आहे. या आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी १६ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता पणदूर येथे स्वयंपाकी कर्मचाऱ्यांची सभा आयोजित करण्यात आली आहे.साडेतीन तास आगीसमोर बसून स्वयंपाकी महिला शालेय पोषण आहार शिजवून देतात. असे असले तरी त्यांना केवळ एक हजार रुपए एवढे तुटपुंजे मानधन दिले जाते. मात्र त्यासाठीही या कर्मचाऱ्यांना मोर्चे काढावे लागतात. पोषण आहार ज्या ठिकाणी शिजविला जातो. त्याच ठिकाणी या कर्मचाऱ्यांनी सफाई करायची आहे. मात्र त्यांच्याकडून पूर्ण शाळेची सफाई करून घेतली जात आहे. त्याकडे मात्र शिक्षण विभाग मूग गिळून गप्प बसतो.स्वयंपाकी कर्मचाऱ्यांना मनमानीपणे कामावरून काढू नये असे असतानाही देवगड मध्ये काही स्वयंपाकी कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात आले आहे. या प्रकरणाकडे लक्ष द्यायला शिक्षण विभागाला वेळ नाही. एकंदरित पाहता स्वयंपाकी महिला कर्मचाऱ्यांचे शोषण करण्याची पातळी शिक्षण विभागाने ओलांडली आहे.
या विरोधात आंदोलन करण्याचा निर्णय सामाजिक शालेय पोषण आहार स्वयंपाकी संघाने घेतला आहे. या आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी १६ डिसेंबर रोजी पणदूर येथे स्वयंपाकी कर्मचाऱ्यांची सभा आयोजित करण्यात आली असून या सभेला स्वयंपाकी महिला कर्मचाऱ्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन कमल परुळेकर यांनी केले आहे.