सिंधुदुर्गनगरी : मुंबई महानगरपालिकेत वैश्य समाजातील प्रथम महापौर बसण्याचा मान सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुपुत्र प्राचार्य विश्वनाथ म्हाडेश्वर यांना मिळाला. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज बांधवांकडून सिंधुदुर्ग वैश्यभूषण पुरस्कार देऊन विश्वनाथ म्हाडेश्वर यांचा गौरव २९ एप्रिल रोजी सकाळी १०.३० वाजता येथील वसंतराव आचरेकर प्रतिष्ठान येथे करण्यात येणार आहे.
हा सत्कार पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते होणार असून या कार्यक्रमाला वैश्य समाज जिल्हाध्यक्ष सुनील भोगटे यांची प्रमुख उपस्थिती असणार असल्याची माहिती संयोजक शंकर पार्सेकर, सीताराम कुडतरकर, डॉ. सुहास पावसकर यांनी संयुक्तरित्या येथे दिली.कणकवली येथे बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शंकर पार्सेकर पुढे म्हणाले, मुंबई महानगरपालिकेत आतापर्यंत ७६ महापौर होऊन गेले. त्यानंतर विश्वनाथ म्हाडेश्वरांच्या रुपाने वैश्य समाजाचा महापौर सर्वात मोठ्या महानगरपालिकेत बसला आहे.
यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैश्य समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन शंकर पार्सेकर यांनी केले.