कुडाळ : कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या लांब पल्ल्याच्या कोकणकन्या, मत्स्यगंधा अशा गाड्यांमधील प्रवाशांचे दागिने, पैसे तसेच इतर साहित्य चोरणाऱ्या तीन संशयितांच्या मुसक्या आवळण्यात सिंधुदुर्गच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाला यश आले आहे. त्यांना बीड, कोल्हापूर व हिंगोली येथून ताब्यात घेतले आहे. या तिघांना न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.या प्रकरणी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात अनेक गुन्ह्यांची नोंद असून तिन्ही जिल्ह्यांचे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पोलीस या चोरट्यांच्या मागावर होते.
या प्रकरणी पोलीस निरीक्षक प्रल्हाद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रविराज फडणीस व त्यांच्या पथकाने प्रकाश नागरगोजे (२१, रा. बीड), तानाजी शिंदे (२१, रा. हिंगोली) व महेश किल्लेदार (२३, रा. कोल्हापूर) यांना अटक केली आहे.या तिघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तिघांनाही एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास कुडाळ पोलीस करीत आहेत.प्रवाशांचे सोन्याचे दागिने लंपासगेल्या महिनाभरापासून कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये प्रवाशांचा मुद्देमाल चोरण्याच्या घटना सर्रास घडू लागल्या आहेत. चोरी करताना चोरटे गुंगीचे पेय देऊन प्रवाशांना लुटत होते. तसेच गाढ झोपेत असलेल्या प्रवाशांचे साहित्यही लंपास करण्यात आले होते.