सिंधुदुर्ग : कुंभार समाजाच्या शैक्षणिक,आर्थिक व सामाजिक विकासासाठी कुंभार समाजाला भटक्या जमातीमध्ये आरक्षण मिळावे अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा कुंभार समाज उत्कर्ष मंडळाने जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.संत गोरा कुंभार समाज उत्कर्ष मंडळाच्यावतीने जिल्हाधिकारी पांढरपट्टे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
यावेळी कोकण विभागीय उपाध्यक्ष यशवंत शेदुलकर, जिल्हा अध्यक्ष गणपत शिरोडकर, उपाध्यक्ष विलास गुडेकर, राजेंद्र हरमलकर, जयदीप वावळीये, नारायण साळवी, करूणा चिंदरकर, पुरूषोत्तम वावळीये, नारायण कुंभार, काशिनाथ तेंडुलकर, अभय हिंदळेकर, मानसी भोगावकर, पुनम वारेगावकर यांच्यासह अन्य कुंभार समाज बांधव उपस्थित होते.जिल्हाधिका-यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कुंभार समाजाचा मुख्य व्यवसाय मातीपासून विविध वस्तू तयार करणे हा आहे. या व्यवसायासाठी आवश्यक असणारी माती व पाणी ज्याठिकाणी असेल तेथे स्थलांतरित होवून पूर्वंपार हा व्यवसाय सुरू आहे. वारंवारच्या स्थलांतरामुळे या समाजातील मुले शिक्षणापासून वंचित राहत आहेत. त्यामुळे समाजाचा विकास होत नाही. त्यामुळे कुंभार समाजाच्या आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक विकासासाठी कुंभार जातीला भटक्या जातीमध्ये आरक्षण मिळावे अशी मागणी करण्यात आली आहे.शासनाचे दुर्लक्षकुंभार समाजाला भटक्या जमातीमध्ये आरक्षण मिळावे यासाठी गेली कित्येक वर्षे संघटनेच्या माध्यमातून मागणी लावून धरली आहे. मात्र याकडे शासन दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. तरी या मागणीच्या अनुषंगाने शासनाने कुंभार समाजाला भटक्या जमातीत(एन.टी) आरक्षण मिळवून द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे.