सावंतवाडी : गोवा-बांबोळी येथील वैद्यकीय महाविद्यालयात परप्रांतीय रूग्णांकडून फी आकारणी सुरू केल्याच्या निषेधार्थ सावंतवाडीत ५० मीटरच्या अंतरावर दोन जनआक्रोश आंदोलने झाली. दोन्ही आंदोलनांना चांगला प्रतिसाद मिळाला असून, गोवा मेडिकल कॉलेज उभारताना सिंधुदुर्गचा वाटाही त्यात मोलाचा आहे. त्यामुळे आम्हाला यामध्ये सामावून घ्या. फी आकारणी अशीच सुरू राहिली तर भविष्यात सिंधुदुर्ग जिल्हा बंद ठेऊन आंदोलनात उतरू, असा इशारा आंदोलनात सहभागी झालेल्यांनी दिला आहे.
आंदोलनादरम्यान प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांनीही चर्चा केली. तर माजी आमदार राजन तेली यांनी आंदोलनकर्त्यांसोबत असल्याचे जाहीर केले. दोडामार्ग येथे गोवा-बांबोळी येथील रूग्णालयात फी आकारणी सुरू केल्याच्या निषेधार्थ जनआक्रोश आंदोलन सुरू आहे.
या आंदोलनाला शनिवारी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी दोडामार्ग येथे जाऊन पाठिंबा दिला होता. त्यानंतर त्यांनी सावंतवाडीत जनआक्रोश आंदोलन पुकारण्याचा निर्णय घेतला होता. तर सामाजिक कार्यकर्ते वसंत केसरकर व मंगेश तळवणेकर यांनीही यापूर्वीच सोमवारी २६ मार्चला प्रांताधिकारी कार्यालयासमोर उपोषण करणार, असे सांगितले होते. तर साळगावकर यांनी शनिवारी हे जाहीर केले होते. पण रविवारी सायंकाळी नगराध्यक्ष साळगावकर यांनी आपण वेगळे आंदोलन करणार असे जाहीर केले होते.त्याप्रमाणे सोमवारी प्रांताधिकारी कार्यालयाबाहेर सामाजिक कार्यकर्ते मंगेश तळवणेकर यांनी, तर जीवन प्राधिकारण कार्यालयाच्या बाजूला नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी जनआक्रोश आंदोलन केले. ही दोन्ही आंदोलने अवघ्या ५० मीटरच्या आत होती. नगराध्यक्ष साळगावकर यांनी सकाळी ९ वाजल्यापासून सुरू केलेल्या जनआक्रोश आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
बार असोसिएशनच्यावतीने अॅड. दिलीप नार्वेकर यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला. तर व्यापारी संघानेही आंदोलनात सहभाग दर्शविला. त्याशिवाय माजी आमदार राजन तेली, उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर, नगरसेवक बाबू कुडतरकर, सभापती आनंद नेवगी, मनोज नाईक, माजी नगरसेवक विलास जाधव, संजय पेडणेकर, सुरेश भोगटे, साक्षी कुडतरकर, कीर्ती बोंद्रे, साक्षी सावंत, शर्वरी धारगळकर, अफरोझ राजगुरू, सुदन आरेकर, कॉन्ट्रॅक्टर बी. एन. त्रिमूर्ती, शिवाजी पाटील, रमेश बोंदे्र, पत्रकार सीताराम गावडे, शशी नेवगी, अरूण भिसे, अमित परब, गुंडू जाधव, सचिन इंगळे, रवी जाधव, राजू पनवेलकर, शिवसेना शहरप्रमुख शब्बीर मणियार, अभय पंडित आदींसह तब्बल सातशे नागरिकांनी भेट दिली.पोलिसांकडून कडक बंदोबस्तप्रांताधिकारी कार्यालयाच्या बाहेर दोन आंदोलने असल्याने पोलीस निरीक्षक सुनील धनावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अरूण जाधव, योगेश जाधव, अरूण सावंत यांचा कडक बंदोबस्त ठेवला होता. यावेळी पोलीस कर्मचारी अमोद सरगळे, वासुदेव परब, संजय हुंबे, प्रमोद काळसेकर आदी उपस्थित होते.
मी नेहमीच जनतेसोबत जोडलेला : साळगावकरआम्ही आजचा एक दिवस दोडामार्गवासीयांच्या जनआक्रोश आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बसत आहोत. पण यापुढेही कायमच जनतेसोबत असणार आहे. नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. हा जनतेचा उद्रेक आहे. त्यामुळे सर्वच नेत्यांनी यातून धडा घेतला पाहिजे व लवकरात लवकर तोडगा काढला पाहिजे, अशी अपेक्षा नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी व्यक्त केली.