सावंतवाडी : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत जिल्ह्यातील कंत्राटी आरोग्य कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या कामबंद आंदोलनाला शिवसेना-भाजप युती सरकार जबाबदार आहे.
कामबंद आंदोलनाचा फटका रुग्णांना बसत असल्याने जनतेला आता पालकमंत्र्यांच्या व आरोग्यमंत्र्यांच्या कार्यालयासमोर जाऊन आंदोलन करण्याची वेळ आल्याची टीका जिल्हा काँग्रेस सरचिटणीस राजू मसुरकर यांनी केली आहे.जिल्हा रुग्णालयात तसेच उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी येथे मोठ्या प्रमाणात रुग्ण उपचाराकरिता दाखल होत असतात. मात्र सद्यस्थितीत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सुरू असलेल्या संपामुळे रक्तपेढी व डायलिसीस सेंटर बंद पडल्यात जमा आहे. परिणामत: तज्ज्ञ नसल्याने रुग्णांना खासगी रुग्णालयाचा आधार घ्यावा लागत आहे.
गोरगरीब रुग्णांना डायलिसीस करण्यासाठी एका दिवसाला कमीत कमी १५०० रुपये खर्च आहे. त्यामुळे महिन्यातून बारा ते पंधरा हजार एवढा महिन्याचा खर्च एका रुग्णाला येतो.
किंंबहुना जिल्हा रुग्णालयात हा उपचार राजीव गांधी जीनवदायी योजनेअंतर्गत मोफत मिळत आहे. त्यामुळे अशा रुग्णांना उपचाराकरिता जिल्हा रुग्णालयात अथवा उपजिल्हा रुग्णालयात उपचाराकरिता नंबर घ्यावा लागत आहे.