सिंधुदुर्गनगरी : सत्तेत येऊन चार वर्षे उलटलेल्या केंद्र व राज्य सरकारने सत्तेत येण्यापूर्वी दिलेली आश्वासने पाळली नाहीत. त्याउलट जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढविल्या आहेत. परिणामी सर्वसामान्य जनतेत या विरोधात असलेला असंतोष वाढत आहे. त्यामुळे जनतेचा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशाप्रकारचे निवेदन सोमवारी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्यावतीने जिल्हा प्रशासनाला देण्यात आले.निवासी उपजिल्हाधिकारी विजय जोशी यांनी हे निवेदन स्वीकारले. यावेळी जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्मा सावंत, उपाध्यक्ष रणजित देसाई, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, अल्पसंख्याक सेल अध्यक्ष नासीर काझी, मंदार केणी, विकास कुडाळकर, मनीष दळवी व स्वाभिमान पक्षाचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
देशभरात पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झालेली आहे. महाराष्ट्र राज्यातील या वस्तूंच्या किमतीत झालेली वाढ अन्य राज्यांच्या तुलनेत मोठी आहे. १ सप्टेंबरला पेट्रोलचा असलेला ८६.०९ हा दर १० सप्टेंबर रोजी ८७.८९ एवढा वाढला आहे. तर डिझेलचा दर ७४.७६ वरून ७७.०९ एवढा झाला आहे. ५ वर्षांपूर्वी ४०० रुपये दराने मिळणारा घरगुती गॅस सिलिंडर ८२५ रुपये झाला आहे.
रास्त धान्य दुकानावर जीवनावश्यक वस्तू मिळेनाशा झाल्या आहेत. अल्प प्रमाणात धान्य दिले जात आहे. हे धान्य मिळण्यासाठी आॅनलाईन नोंदणी करण्याची अट असताना गावागावात इंटरनेट सुविधा नसल्याने जनतेला त्याचा त्रास होत आहे.जनआंदोलन छेडण्याचा स्वाभिमानचा इशारासिंधुदुर्ग जिल्ह्यात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. त्यामुळे येथील जनतेला आपल्या पोटापेक्षा गणेशाची काळजी आहे. मात्र, तीच काळजी यामुळे वाढल्याची खंत त्यांच्या मनात आहे. त्यामुळे याकडे आम्ही लक्ष वेधत आहोत. याबाबत वस्तुस्थिती शासन दरबारी मांडून जनतेला न्याय मिळवून द्यावा. अन्यथा आम्हांला नाईलाजास्तव जनआंदोलन छेडावे लागेल, असा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.