सावंतवाडी : ग्रामसेवक म्हणून पदोन्नती झाल्याच्या चिंतेने कलबिस्त येथील ग्रामपंचायतीच्या सदानंद शांताराम जाधव (वय ४०) शिपायाने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना आज सकाळी उघडकीस आली. रात्री घरातील अन्य सदस्य दुसर्या खोलीत झोपल्याचे पाहून रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास त्याने हा प्रकार केला. याबाबत सावंतवाडी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद आहे. सावंतवाडी कलबिस्त ता. सावंतवाडी येथील ग्रामपंचायतीत गेले चौदा ते पंधरा वर्षे सदानंद हा काम करीत होता. दरम्यान त्याला चार दिवसापुर्वी तुमचे ग्रामसेवक म्हणून पदोन्नती झाली आहे. त्यामुळे तुम्हाला तो कार्यभार स्विकारावा लागेल, असे पत्र जिल्हा प्रशासनाकडुन प्राप्त झाले. पदोन्नती मिळाली तरी अन्य ठिकाणी बदली होणार, आपल्याला ते जमणार नाही. त्यामुळे आपल्याला टेंशन आले आहे, असे त्याने अनेकांना सांगितले होते.हे पत्र आल्यापासुन तो चिंतेत होता. काल रात्री ग्रामपंचायतीतले काम आटपून घरी गेल्यानंतर तो नेहमीप्रमाणे कुटूंबाशी बोलला आणि रात्री उशिरा अडीच वाजण्याच्या सुमारास त्याने घरात असलेल्या बाजूच्या खोलीत नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास लावून घेतला. सकाळी हा प्रकार त्याच्या आईवडीलांचा लक्षात आला. आपल्या मुलाने आत्महत्या केल्याचे लक्षात येताच त्यांच्यासह पत्नी व मुलांनी हंबरडा फोडला. सदानंद हा गेली चौदाहून अधिक वर्षे ग्रामपंचायतीत काम करीत होता. त्याचा स्वभाव मनमिळावू असल्यामुळे अनेकांशी त्यांचे चांगले संबंध होते. त्यामुळे त्याने आत्महत्या केल्याची माहिती मिळताच अनेकांनी हळहळ व्यक्त केली. येथील कुटीर रुग्णालयात त्याचे शवविच्छेदन करण्यात आले.याबाबत सावंतवाडी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. त्याच्या पश्चात आईवडील, दोन मुले, पत्नी असा परिवार आहे. याबाबतची माहिती मिळताच पंचायत समिती सदस्य रवी मडगावकर, सरपंच शरद नाईक, पोलिस पाटील गणू राउळ आदींनी येथील कुटीर रुग्णालयात धाव घेत मदतकार्यात सहकार्य केले.पदोन्नतीच्या भितीने आत्महत्यायाबाबतची माहिती पंचायत समिती सभापती रवी मडगावकर यांनी दिली. त्याची पदोन्नती १७ तारखेला होती. आवश्यक कागदपत्रे जमा करण्याच्या सुचना त्याला मिळाल्या होत्या; मात्र त्या दिवसापासून तो चिंतेत होता; प्रमोशन मिळाले तरी अन्य ठिकाणी बदली होणार, आपल्याला ते जमणार नाही. त्यामुळे आपल्याला टेंशन आले आहे, असे त्याने अनेकांना सांगितले होते. या चिंतेमुळे त्याने हा प्रकार केला असावा, अशी शक्यता त्यांनी वर्तविली आहे.