देवगड : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन क्षेत्रात मालवणचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. मात्र भविष्यात देवगड तालुका हा पर्यटनदृष्टया अग्रेसर व पुरोगामी तालुका म्हणून गणला जाईल, असे मत आमदार नीतेश राणे यांनी व्यक्त केले. देवगड येथे नववर्षाच्या स्वागतासाठी आयोजित केलेल्या जल्लोष २०१८ या कार्यक्रमाचा शुभारंभ शनिवारी आमदार नीतेश राणे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.ते म्हणाले, देवगड तालुक्याची ओळख ही तीन वर्षांपूर्वी मागास तालुका म्हणून होती. मात्र तो पुरोगामी आणि विकासासाठी अग्रेसर ठरावा म्हणून माझे प्रयत्न सुरू आहेत. देवगडमध्ये लवकरच स्कुबा डायव्हिंग सेंटर सुरू होणार असून दोन स्क्रिनचे चित्रपटगृहदेखील आपण सुरू करणार आहोत.
येथे वॅक्स म्युझियम सुरू झाल्याने देवगडमध्ये पर्यटनाच्या दृष्टीने वाढ होत आहे. यापूर्वी विकासासाठी अथवा प्रकल्पासाठी विरोधाचे पत्र देण्याची पद्धत देवगड तालुक्यात होती. मात्र देवगड तालुक्याची मानसिकता अशाच जल्लोषसारख्या कार्यक्रमाने बदलेल असा आशावादही आमदार राणे यांनी व्यक्त केला.
देवगड तालुका सर्वांगाने अग्रेसर करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करु. देवगड तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी मी सतत संघर्ष करीत असतो. इतर तालुक्यांना मिळणारा निधी आपल्या देवगड तालुक्यालाही मिळायला हवा यासाठी मी सतत प्रयत्न करीत असतो. यामुळे भविष्यात हा तालुका जिल्ह्यात अग्रेसरच असेल, असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.यावेळी देवगड-जामसंडे नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा प्रियांका साळसकर, उपनगराध्यक्ष योगेश चांदोस्कर, कोकण माती प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश गायकवाड, अॅड. अविनाश माणगावकर, देवगड-जामसंडे नगरपंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी परितोष कंकाळ, प्रकाश राणे, एकनाथ तेली, पोलीस निरीक्षक जयकुमार सूर्यवंशी, तालुकाध्यक्ष डॉ. अमोल तेली, संदीप साटम, व्यापारी पर्यटन संस्थेचे अध्यक्ष हनीफशेठ मेमन, शामराव पाटील व सर्व व्यापारी बांधव यावेळी उपस्थित होते. देवगड-जामसंडे नगर पंचायतीच्यावतीने देवगड येथे उपक्रमांची माहिती देणाऱ्या स्टॉलचे उद्घाटनही आमदार नीतेश राणे यांनी फित कापून केले.