वेंगुर्ले : वेंगुर्ले बंदरमुळे तालुक्याला मोठे निसर्गवैभव मिळाले आहे. याचा पर्यटनाच्या माध्यमातून लाभ करून घेण्यासाठी मुंबई मरिन ड्राईव्हच्या धर्तीवर मांडवी खाडी ते बंदरनजीक वॉक वे, पाणबुडी आदी सुविधांसह केरळच्या धर्तीवर खाडीवर झुलता पूल केला जाईल, अशी घोषणा गृहराज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केली.येथील सागर विश्रामगृहावर वेंगुर्ले शहर विकासासंदर्भात संबंधित सर्व खात्यांच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत पालकमंत्री केसरकर बोलत होते. यावेळी मेरीटाईम बोर्डाचे उपअभियंता डी. जी. पटेकर, सहाय्यक अभियंता व्ही. व्ही. करंगुटकर, कनिष्ठ अभियंता व्ही. व्ही. एकावडे, मुख्याधिकारी वैभव साबळे, नगराध्यक्ष राजन गिरप आदी उपस्थित होते.यावेळी पालकमंत्री केसरकर म्हणाले, वेंगुर्ले मांडवी खाडीलगत ते पोर्ट आॅफिसपर्यंतचा भाग खाडी व समुद्र्राच्या दिशेने कोसळला आहे. या भागात मरीन ड्राईव्हच्या धर्तीवर वॉक वे तसेच पर्यटकांना येथील निसर्गसौंदर्य न्याहाळण्यासाठी बैठक व्यवस्था केली जाणार आहे. तसेच जेटी ते बंदर अशी पाणबुडी आणली जाईल. त्याकरिता येथील जुन्या बर्फ कारखान्याच्या जागेचा वापर करुन पाणबुडी व्यवस्थापन केले जाईल.
झुलता पुलाच्या जुन्या डिझाईनमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाने तांत्रिक मुद्दे निर्माण केल्याने मांडवी खाडीवर केरळच्या धर्तीवर येथील वातावरणास पूरक लोखंडी पूल किंवा जुन्या पुलात फेरबदल केला जाणार आहे. नवाबाग येथे मच्छिमारांच्या घरामध्ये पर्यटन योजतेतून पर्यटकांसाठी राहण्याची सोय केली जाईल. नवाबाग येथे मच्छिमारांसाठी टाकाऊ माशांची भुकटी कारखाना तसेच मासे वाळविण्यासाठी अत्याधुनिक पद्धती व बर्फ व्यवस्था केली जाणार आहे, असे ते म्हणाले.तिलारी धरणातून वेंगुर्ले, चिपीसाठी पाणी!तिलारी पाणी योजनेकरिता मागील अर्थसंकल्पात आपण शंभर कोटी मंजूर केले असून, याद्वारे तिलारी धरणातील पाणी पहिल्या टप्प्यात वेंगुर्ले शहरासाठी व दुसऱ्या टप्प्यात चिपी विमानतळाला दिले जाईल. याबरोबरच निशाण तलावाचे पाणी व तिलारी पाणी यातून वेंगुर्ले शहराचा पाण्याचा प्रश्न सोडविला जाईल, अशी माहिती पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.