सिंधुदुर्गनगरी : आरोग्य सेवेसाठी दोडामार्ग येथे सुरू झालेल्या जनआक्रोश आंदोलनाचा विषय मंगळवारी झालेल्या स्थायी समिती सभेत जोरदार गाजला. या आंदोलनास स्थायी समितीचा पूर्णपणे पाठिंबा असून जनतेच्या आरोग्याचा प्रश्न सुटणे महत्त्वाचा आहे, अशी भूमिका या सभेत मांडतानाच आरोग्यासारखा महत्त्वाचा विषय समोर असताना जिल्ह्याचे सुपुत्र व आरोग्यमंत्री तसेच पालकमंत्री यांना त्याचे कोणतेही सोयरसुतक नसल्याचा सूरही या सभेत उमटला.जिल्हा परिषद स्थायी समितीची मासिक सभा जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्मा सावंत यांच्या अध्यक्षतेखाली येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात झाली.
यावेळी उपाध्यक्ष रणजित देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी के. मंजुलक्ष्मी, विषय समिती सभापती सायली सावंत, संतोष साटविलकर, शारदा कांबळे, समिती सचिव तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे, सदस्य सतीश सावंत, संजय पडते, अंकुश जाधव, राजेंद्र म्हापसेकर, अमरसेन सावंत, दादा कुबल, संजना सावंत, अधिकारी, खातेप्रमुख उपस्थित होते.मंगळवारी झालेली स्थायी समिती सभा पालकमंत्री, जिल्ह्यातील आरोग्य विषय, जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षणाचे विषय आदी विषयांवरून जोरदार गाजली. कित्येकवेळा सत्ताधारी स्वाभिमान पक्षाचे सदस्य आणि शिवसेना सदस्य यांच्यामध्ये खडाजंगी झाली.
महामार्गाचे काम नीट न होणे, एसटी वेळेवर न सुटणे आदी बारीकसारीक विषयांवरून सत्ताधारी सदस्य पालकमंत्र्यांचे नाव घेऊन डिवचत होते. त्यामुळे सभागृहात या दोन्ही गटात बऱ्याचवेळा कलगीतुऱ्यांचे सामने रंगत होते. दोडामार्ग येथे सुरू असलेल्या जनआक्रोश आंदोलनाच्या विषयावर तर सदस्य अंकुश जाधव यांनी आक्रमक भूमिका घेत जिल्ह्याचे सुपुत्र आरोग्यमंत्री दीपक सावंत आणि पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले.गेले पाच दिवस हे आंदोलन सुरू असताना आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी जिल्ह्याच्या आरोग्याचा प्रश्न सोडविणे सोडाच पण साधी या आंदोलनाला भेटही दिली नाही. तर पालकमंत्री घोषणा वगळता काही करीत नाहीत. त्यामुळे जिल्ह्याच्या विकासाचा आणि आरोग्याचा असे दोन्हीही दीपक विझण्याची भीती असल्याचा घणाघात केला . स्थायी समितीचा या आंदोलनाला पाठिंबा असल्याचे सतीश सावंत यांनी जाहीर केले. त्याला सर्वांनी एकमताने संमती दर्शविली.
माध्यमिक शिक्षण विभाग रडारवरमाध्यमिक शिक्षण विभागांतर्गत येणाऱ्या विद्यालयांचे बरेच प्रश्न ऐरणीवर आले आहेत. मात्र, त्यावर कोणताच ठोस निर्णय होत नाही. या विषयावरून सदस्यांनी माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना धारेवर धरले. वाडोस माध्यमिक विद्यालयातील शिपाई विषय, नेमळे हायस्कूलमधील शिक्षक धमकी प्रकरण, मठ दाभोळी हायस्कूलमधील शिक्षक नियुक्ती अशा बऱ्याच विषयांवर सदस्यांनी शिक्षण विभागाला धारेवर धरले.
सदस्य सतीश सावंत यांनी तर शिक्षणाधिकाऱ्यांना आपले अधिकार वापरता येत नाहीत. त्यांचा आपल्या कर्मचाऱ्यांवर वचक नाही असे सुनावले. अखेर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आपण या विषयात लक्ष घालते असे स्पष्ट केले.