कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्याला संसदपटूंची परंपरा आहे. मात्र, तुम्ही निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींमुळे ही परंपरा खंडित झाली आहे. तुमचे आमदार, खासदार आणि पालकमंत्र्यांचा प्रशासनावर वचक नाही. त्यामुळे जिल्हा विकासात सातत्याने मागे जात आहे, अशी खंत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस तथा माजी खासदार निलेश राणे यांनी व्यक्त केली. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्यावतीने आंब्रड विभागातील पक्षाच्या सभासद नोंदणीच्या शुभारंभावेळी ते बोलत होते.महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्यावतीने विभागीयस्तर सदस्य नोंदणीला सुरुवात करण्यात आली आहे. या नोंदणीचा शुभारंभ निलेश राणे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, स्वाभिमान पक्षाचे उपाध्यक्ष विकास कुडाळकर, तालुकाध्यक्ष दीपक नारकर, माजी सभापती मोहन सावंत, सरपंच विठ्ठल तेली, उपसरपंच विजय परब, माजी जिल्हा परिषद सदस्या कल्पिता मुंज, पंचायत समिती सदस्य अरविंद परब, माजी सरपंच विकास राऊळ, आबा परब, सदानंद परब, दिनेश राणे आदी उपस्थित होते.
यावेळी निलेश राणे पुढे म्हणाले, आमदार वैभव नाईक यांनी फक्त गणेश चतुर्थीला धूप, अगरबत्ती वाटून तुम्हांला गृहीत धरले आहे. पण गावासाठी विकासनिधी दिलेला नाही. हे तुम्हांला येणाऱ्या काळात समजून चुकेल. वैभव नाईक यांचा भाऊ विनयभंग प्रकरणात अटक झालेला होता. तसेच स्वत: आमदार नाईक यांच्यावर वाळू चोरीसंदर्भात गुन्हा दाखल झालेला आहे. असे आमदार विकासनिधी आणून गावाचा विकास काय करणार? असा सवाल राणे यांनी उपस्थित केला.आमदार नाईक यांनी एकदा तरी सरकारला अंगावर घेतले, असा क्षण दाखवा, असे ते म्हणाले. खासदार विनायक राऊत यांच्या तळगाव या गावामध्येच अनेक प्रश्न आहेत, ते त्यांना सुटत नाहीत. शेजारीच असलेल्या एका गरीब कुटुंबाचे घर पावसाळ्यामध्ये पडले. या घटनेला वर्ष होऊनसुद्धा त्या ठिकाणी खासदारांनी भेट दिली नाही. एक कुटुंबीय खासदारांना भेटायला गेले होते. मात्र, त्या ठिकाणीही ते भेटले नाहीत. असे खासदार या मतदारसंघात काम काय करणार? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. शिवसेनेच्या पालकमंत्री, आमदार, खासदार यांना प्रशासन जुमानत नाही.नारायण राणे मंत्री असताना प्रशासनावर त्यांचा वचक होता. ते बोलण्यापूर्वीच या जिल्ह्यासाठी मंत्रालयातून निधी येत होता. आता तशी परिस्थिती नाही, असे सांगून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा परिषद ही नारायण राणेंच्या अधिपत्याखाली असल्यामुळे सुरक्षित आहे. रत्नागिरीतील जिल्हा परिषद शिवसेनेच्या अधिपत्याखाली असल्यामुळे आता ती दिवाळखोरीत निघाली असल्याचे त्यांनीसांगितले.यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल सांगितले की, त्यांना सातत्याने बारामती निवडून देते. त्या ठिकाणी व्यक्ती बघितली जाते. आपला विकास कोण करू शकतो हे त्यांना माहीत आहे. त्यामुळे सातत्याने अजित पवार, सुप्रिया सुळे हे निवडून येत आहेत, असेही ते म्हणाले.सतीश सावंत हे अनुभवी कार्यकर्ते आहेत. नारायण राणेंच्या पहिल्या निवडणुकीपासून ते त्यांच्यासोबत आहेत. त्यांचा असलेला अनुभव हा निश्चितच या मतदारसंघाला विकासाच्या दिशेने घेऊन जाणार आहे, असे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप परब यांनी केले तर प्रास्ताविक आबा मुंज यांनी केले.सदस्य नोंदणीसाठी युवकांची उसळली गर्दीमहाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची सदस्य नोंदणी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत सुरू झाली. या सदस्य नोंदणीला जनतेकडून चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. आंब्रड येथील विभागीय सदस्य नोंदणीलासुद्धा भरभरून प्रतिसाद मिळाला. या सदस्य नोंदणीवेळी युवकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. या विभागातून सुमारे पाच हजार सदस्य हे स्वाभिमान पक्षाचे केले जातील, असे जिल्हा परिषद सदस्य सतीश सावंत यांनी यावेळी सांगितले.