दोडामार्ग : घोटगेवाडी येथे गवे व रानडुकरांनी केळी बागायतीचे अतोनात नुकसान केल्याने शेतकऱ्यांना लाखो रूपयांचा आर्थिक फटका बसला आहे. गुरूवारी एका रात्रीत तब्बल एक हजाराहून अधिक केळीची झाडे उद्ध्वस्त केली. अपार मेहनत करून फुलविलेल्या बागायती एका रात्रीत होत्याच्या नव्हत्या झाल्याने नुकसानग्रस्त शेतकरी रडकुंडीला आला आहे.दोडामार्ग तालुक्यात केळी बागायतीला व्यावसायिक स्वरूप केरळीयनांनी दिले. केरळीयनांच्या पावलावर पाऊल ठेवत तालुक्यात मोठ्या प्रमाणात केळी लागवड केली आहे. तिलारी काठालगत व प्रकल्पाच्या कालव्या लगतच्या क्षेत्रातही लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे.तालुक्यातील घोटगेवाडी गावातही सुशिक्षित युवकांनी नोकरीधंद्याच्या मागे वेळ न दवडता अपार मेहनत करून केळी बागायती फुलविल्या आहेत.
मात्र, या बागायतींवर हत्ती पाठोपाठ आता गवे व रानडुक रांची वक्रदृष्टी पडली आहे. गुरूवारी एका रात्रीत तेथील शेतकरी भालचंद्र कुडव, अनिकेत कुडतरकर, सचिन केसरकर, गुरूदास दळवी, धोंडी दळवी, सूर्याजी शेटकर यांच्या केळी बागायतींचे नुकसान केले.