मालवण : पश्चिम किनारपट्टीवर मासेमारी हंगाम सुरू झाला आहे. किनारपट्टी भागात मासेमारी करण्यास अजूनही जोर आला नाहीये, मात्र मच्छिमार बांधव मासेमारी करत असलेल्या रापण पद्धतीच्या जाळीतून मासळीबरोबरच मोठ्या प्रमाणात मिळत असलेला प्लास्टिकचा कचरा मोठी डोकेदुखी ठरत आहे.महाराष्ट्र शासनाने प्लास्टिक बंदी आणली. त्यानंतर प्लास्टिक पिशव्यांवर बंदीबाबत प्रशासनाकडून कडक धोरण अवलंबून कारवाईचा बडगा उगारण्यात आला. मात्र मानवनिर्मित झालेल्या प्लास्टिक कचऱ्याचा भस्मासूर रोखण्यात यंत्रणांना अपयश येत आहे. समुद्र्र किनारे स्वच्छ राहण्यासाठी सरकारकडून अनेक उपक्रम हाती घेण्यात येत असले तरी प्लास्टिकचा भस्मासूर रोखण्यास अद्याप म्हणावे तसे यश येत नाहीय.
मालवण दांडी समुद्र किनारी शुक्रवारी सकाळी एका रापण संघाच्या रापणीमध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कचरा मिळून आला. त्यामुळे मत्स्य हंगामात मासळीबरोबरच मिळणारा प्लास्टिक कचरा मच्छिमार बांधवांसाठी डोकेदुखी ठरत आहे.
प्लास्टिक पिशव्या बंदी आणि समुद्र्किनारा स्वच्छता उपक्रमांमधून होणाऱ्या जनजागृतीमुळे हानिकारक प्लास्टिक कचऱ्यापासून सागरी पर्यावरण वाचवू शकू याविषयी मात्र मच्छिमार आशावादी आहेत.