वैभववाडी : तालुक्यातील निम्म्याहून अधिक गावांच्या नागरिकांची मदार असलेल्या उंबर्डे प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अद्याप बिघडलेलेच आहे. तब्बल ६९ लाख रुपयांची दुरुस्ती होऊनसुद्धा वीज आणि पाण्याअभावी गेले ५ महिने आरोग्य केंद्राची सुसज्ज इमारत बंद आहे. त्यावरुन गेल्या पाच महिन्यांत प्राथमिक आरोग्य केंद्राला अत्यावश्यक सुविधा पुरविण्यात प्रशासन अपयशी ठरल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे. त्यामुळेच इमारत उपलब्ध असूनही १८ गावांतील रुग्णांची प्रचंड गैरसोय होताना दिसत आहे.उंबर्डे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारत २०१३-१४ नूतनीकरणासाठी ५२ लाख रुपये शासनाने मंजूर केले होते. जिल्हा परिषदेने केलेल्या अंदाजपत्रकानुसार पहिल्या निविदेला प्रतिसाद मिळू शकला नाही. त्यामुळे सुमारे ६२ लाखांचे सुधारित अंदाजपत्रक बनवून जिल्हा परिषद बांधकामने प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारत नूतनीकरणाचे संनियंत्रण सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सोपविले गेले. त्यानुसार निविदा प्रक्रिया होऊन अडीच-तीन वर्षे रडतखडत नूतनीकरण सुरु होते.६२ लाख रुपये खर्चाच्या अंदाजपत्रकातील तरतुदींनुसार कामाची पूर्तता करुन देताना मंजूर रक्कमेपेक्षा सुमारे सहा लाखांचा म्हणजेच ६८ लाख ७२ हजार एवढा जादा खर्च इमारतीवर झाला आहे. तरीही सप्टेंबर २०१७ मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाने प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत आरोग्य विभागाच्या ताब्यात दिली.
त्यामुळे सुसज्ज इमारत रुग्णसेवेसाठी लवकरच उपलब्ध होऊन तीन वर्षे जागेअभावी सुरु असलेली रुग्णांची हेळसांड थांबेल अशी आशा निर्माण झाली होती. परंतु, या प्राथमिक आरोग्य केंद्रावर अवलंबून असलेल्या १८ गावांच्या नागरिकांचा अपेक्षाभंग झाला आहे.प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारत नूतनीकरणाचे अंदाजपत्रकात जिल्हा परिषद बांधकाम विभागाने विद्युत आणि पाणीपुरवठ्याचा समावेश केलेला नव्हता. त्यामुळे या अत्यावश्यक दोन बाबींसाठी पुन्हा अंदाजपत्रक तयार करुन जिल्हा परिषद बांधकाम विभागाने प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविला आहे.
परंतु, चार महिने उलटले तरी त्या प्रस्तावाला मान्यता मिळू न शकल्याने ६९ लाख खर्च पडलेली उंबर्डे प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत बंदच अवस्थेत आहे. त्यामुळे नूतनीकरण केलेल्या इमारतीचा उपयोग काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.काम असमाधानकारक; चौकशीची मागणी करणारउंबर्डे प्राथमिक आरोग्य केंद्र इमारतीच्या नूतनीकरणात वॉटरप्रुफिंगचा अंतर्भाव होता. परंतु, वॉटरप्रुफिंग ऐवजी छतावर पत्र्याची शेड करण्याची मागणी करण्यात आली. त्यामुळे काम अर्धवट स्थितीत असताना सार्वजनिक बांधकाम विभागाने इमारत आरोग्य विभागाच्या ताब्यात दिली.
मुळात अंदाजपत्रकानुसार काम पूर्ण झालेले नसताना इमारतीचा ताबा घेण्यामागचा आरोग्य विभागाचा हेतू काय? अशी शंका उपस्थित करीत इमारतीच्या नूतनीकरणाचे काम समाधानकारक झालेले नाही. त्यामुळे झालेल्या कामाची चौकशी व्हावी, अशी मागणी आपण मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे करणार आहोत. तसेच इमारतीच्या वीज आणि पाणी जोडणीचे काम तातडीने होण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे जिल्हा परिषद सदस्य सुधीर नकाशे यांनी सांगितले.