कणकवली : तालुक्यातील ओटव सरपंचपदी हेमंत परुळेकर 336 मते मिळवून विजयी झाले आहेत. तर त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार प्रमोद प्रभुदेसाई यांना अवघी 24 मते मिळाली आहेत. तर बेळणे खुर्द येथील ग्रामपंचायत सदस्य पदासाठी झालेल्या निवडणुकीत प्रमोद चाळके, दिलीप तांबे, वैष्णवी करांडे विजयी झाले आहेत.कणकवली येथील तहसील कार्यालयात बुधवारी ओटव ग्रामपंचायतीच्या सरपंच पद तर बेळणे खुर्द ग्रामपंचायत सदस्य पदासाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी झाली. यावेळी तहसीलदार वैशाली माने, निवासी नायब तहसीलदार रविंद्र कडुलकर , सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल साळुंखे, जंबाजी भोसले आदी अधिकारी उपस्थित होते.
ओटव ग्रामपंचायत सरपंच हेमंत परुळेकर
कणकवली तालुक्यातील ओटव ग्रामपंचायत सरपंच पदासाठी प्रमोद प्रभुदेसाई व हेमंत परुळेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यामुळे मंगळवारी सरपंच पदासाठी मतदान घेण्यात आले.
यावेळी 363 एवढे एकूण मतदान झाले होते. तर बुधवारी सकाळी 11 वाजता तहसील कार्यालयात मतमोजणी करण्यात आली. यावेळी झालेल्या मतमोजणीच्या पहिल्या फेरीत हेमंत परुळेकर यांना 146 , दुसऱ्या फेरीत 121 तर तिसऱ्या फेरीत 69 मते मिळाली त्यामुळे एकूण 336 मते मिळवून ते विजयी झाले.तर प्रमोद प्रभुदेसाई यांना पहिल्या फेरीत 18, दुसऱ्या फेरीत 5 तर तिसऱ्या फेरीत 1 अशी 24 मते मिळाली. तर नोटाचा अवलंब 3 मतदारांनी केला. या निवडणुकीत उमेदवाराचे डिपॉझिट वाचण्यासाठी निकषाप्रमाणे 22.5 मते मिळणे आवश्यक होते. प्रमोद प्रभुदेसाई यांना 24 मते मिळाल्याने त्यांचे डिपॉझिट वाचले आहे.ओटव येथील सात ग्रामपंचायत सदस्य यापूर्वीच बिनविरोध निवडून आले आहेत. यामध्ये प्रभाग 1 मधून संजना खांबाळकर व सुनील गावकर , प्रभाग 2 मधून दुर्गेश ओटवकर , अर्चना ओटवकर व लता तेली तर प्रभाग 3 मधून राजेश तांबे व कविता तांबे यांचा समावेश आहे. याठिकाणी संतोष जाधव यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले.तालुक्यातील बेळणे खुर्द येथील दीक्षा चाळके यांचा सरपंच पदासाठी एकच अर्ज दाखल झाल्याने त्या बिनविरोध ठरल्या आहेत. तर प्रभाग 2 मधील एका जागेसाठी व प्रभाग 3 मधील दोन जागेसाठी मंगळवारी मतदान घेण्यात आले.
बुधवारी झालेल्या मतमोजणीत प्रभाग 2 मधून प्रमोद चाळके 82 मते मिळवून विजयी झाले आहेत. तर प्रतिस्पर्धी उमेदवार सचिन चाळके यांना 32 मते मिळाली आहेत. तर 4 मतदारांनी नोटाचा अवलंब केला आहे. याठिकाणी एकूण मतदान 118 इतके झाले होते.प्रभाग 3 मधून दिलीप तांबे यांनी 74 मते मिळवून विजय संपादन केला. तर विनोद तांबे यांना 55 मते मिळाली. नोटाचा अवलंब 12 जणांनी केला.दुसऱ्या जागेसाठी वैष्णवी कारंडे व रसिका तांबे यांच्यामध्ये लढत झाली. वैष्णवी करांडे यांनी 72 मते मिळवून विजय संपादन केला. तर रसिका तांबे यांना 67 मते मिळाली. नोटाचा अवलंब 2 मतदारानी केला.यापूर्वी बेळणे खुर्द येथील प्रभाग 1 मधून राजेंद्र चाळके व सुधा चाळके तर प्रभाग 2 मधून विशाखा पूजारे बिनविरोध ठरल्या आहेत. या प्रभागातील नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी राखीव असलेल्या जागेसाठी कोणीही अर्ज दाखल न केल्याने ती रिक्त रहाणार आहे. या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी यशवंत पवार यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले.