सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील पारंपरिक मच्छिमारांच्या समस्या व किल्ले सिंधुदुर्गसह जिल्ह्यातील प्राचीन मंदिरांसहीत ऐतिहासिक वास्तूंची जपणूक करण्यासाठी शासनाकडून आवश्यक उपाययोजना करण्याबाबत आमदार वैभव नाईक यांनी विधिमंडळात शासनाचे लक्ष वेधले.सिंधुदुर्ग जिल्ह्याला निसर्गाचे वरदान लाभले आहे. येथील वॉटर स्पोर्टस्, स्नॉर्कलिंग व स्कुबा डायव्हिंग या समुद्री विश्वाची ओळख करून देतात. त्यामुळे स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी देण्यासाठी या साहसी जलक्रीडा प्रकल्पांसाठी शासनाकडून जास्तीत जास्त निधीची तरतूद करणे आवश्यक आहे.
जिल्ह्यातील मालवण किनारपट्टीवर असलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्यावर मोठ्या संख्येने देशी, विदेशी पर्यटकांची आणि शिवप्रेमींची वर्दळ सुरू असते. परंतु पर्यटकांसाठी किल्ल्यावर आवश्यक सोयी-सुविधा नसल्याने त्यांची मोठी गैरसोय होत आहे.
किल्ल्यात असलेल्या भारतातील एकमेव शिवराजेश्वर मंदिराच्या पुरातन वास्तूचीही पडझड झालेली आहे. त्यामुळे किल्ले सिंधुदुर्गसह शिवराजेश्वर मंदिराची डागडुजी करण्याच्या दृष्टीने सरकारने प्रयत्न करावेत, अशी सूचना आमदार वैभव नाईक यांनी मांडली.मालवण किनारपट्टीवर समुद्रात बुडालेली कोट्यवधी रुपयांची हाऊसबोट स्थानिक नागरिकांच्या ताब्यात दिली असती तर आज स्थानिक तरुणांना रोजगार मिळाला असता. बुडालेली हाऊसबोट बाहेर काढण्यासाठी शासनाकडे ३० लाखांचा प्रस्ताव केला आहे. परंतु या शासनाच्या रकमेचा अपव्यय करण्यापेक्षा हा निधी जिल्ह्यातील जलक्रीडा प्रकाराच्या अद्ययावत साहित्य खरेदीसाठी वापरून पर्यटन वृद्धी व रोजगार निर्माण करण्याचे प्रयत्न केले पाहिजेत, असे सांगत नाईक यांनी विधिमंडळाचे लक्ष वेधले.
पर्ससीन नौकांवर बंदी आणावीप्रखर प्रकाशझोतातील मासेमारीमुळे मत्स्य व्यवसायावर विपरीत परिणाम होत असल्याने मच्छिमारांच्या उपजीविकेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. पर्ससीन मच्छिमारी करणाऱ्या परप्रांतीय बोटींवर कायमस्वरुपी बंदी आणून सक्त कारवाई होण्यासाठी शासनाने निर्णय घ्यावा, असेही नाईक यांनी सांगत सभागृहाचे लक्ष वेधले. मालवण समुद्रकिनारी मत्स्यजेटीचा विकास करण्यासाठी निधीची उपलब्धता करून देण्याची मागणी नाईक यांनी केली.
ऐतिहासिक वास्तूंची डागडुजी व्हावी !गोवा राज्याप्रमाणे आपल्या राज्यातील पुरातन वास्तू व पुरातन मंदिरांचे जतन व्हावे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी पुरातन मंदिरे व ऐतिहासिक वास्तूंची डागडुजी करून विद्युत रोषणाईची व्यवस्था करण्याची मागणी आमदार नाईक यांनी केली.