दोडामार्ग : तिलारी प्रकल्प अधिकाऱ्यांच्या अनागोंदी कारभारामुळे पुनर्वसन गावठणात जायला पूर्वी रस्ता नव्हता आणि आता तर मृत व्यक्तीला स्मशानभूमीत नेण्यासाठीही रस्ता नाही. ज्यांनी धरणासाठी जमिनी दिल्या, त्यांनाच आता पिण्यासाठी पाणी मिळत नाही, अशी अवस्था पुनर्वसन गावठणाची आहे. आता तुम्हीच सांगा धरणग्रस्तांनी जगायचे कसे, अशी तीव्र व्यथा कुडासे खुर्द ग्रामपंचायतीच्या सरपंच संगीता देसाई यांनी प्रकल्प अधिकाऱ्यांसमोर मांडली.दक्षिण कोकण पाटबंधारे महामंडळाचे अधीक्षक अभियंता मिलिंद नाईक तिलारी दौऱ्यावर आले असता सरपंच सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी प्रकल्प अधिकाऱ्यांच्या अनागोंदी कारभाराचा पाढाच त्यांच्यासमोर वाचला. त्याचबरोबर पुनर्वसन गावठणातील धरणग्रस्तांच्या व्यथाही कथन केल्या.यावेळी प्रकल्पाचे कार्यकारी अधिकारी अभियंता राकेश धाकतोडे, सरपंच सेवा संघाचे अध्यक्ष प्रवीण गवस, कुडासे खुर्द सरपंच संगीता देसाई, झरेबांबर सरपंच स्नेहा गवस, कोनाळ सरपंच पराशर सावंत, खोक्रल सरपंच देव शेटकर, परमे सरपंच आनंद नाईक, मांगेली सरपंच सूर्यनारायण गवस, घोटगे उपसरपंच प्रथमेश सावंत, झरेबांबरचे माजी सरपंच पांडुरग गवस, अनिल शेटकर, संजय नाईक, मनसे तालुका उपाध्यक्ष मायकल लोबो आदी उपस्थित होते.तालुक्यातील पिकुळे, उसप, मोर्ले, खोक्रल, केर, झरेबांबर आदी गावांना धरणाचे पाणी देण्याची मागणी असताना प्रकल्प अधिकारी दुर्लक्ष करतात. मात्र नको त्या ठिकाणी प्रकल्पाचे कोट्यवधी रूपये खर्ची घातले जातात. केवळ ठेकेदारांचे चोचले पुरविण्यासाठी हा आटापिटा अधिकारी करताहेत, असा आरोप सरपंच सेवा संघाचे अध्यक्ष प्रवीण गवस यांनी केला
तर तिलारी धरणाशेजारी उभारलेल्या बगीचाच्या देखभालीवर पाच लाख खर्ची घालण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात बागेची दुरवस्था झाली आहे. यामागचे नेमके गौडबंगाल काय? असा सवालही यावेळी त्यांनी उपस्थित केला.मनसेचे तालुका उपाध्यक्ष मायकल लोबो यांनी धरणाच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित करीत धरणावर बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या कामात गोलमाल झाल्याचा आरोप केला. सीसीटीव्हीसाठी ३९ लाख रूपये खर्ची घालण्यात आले. पण हे कॅमेरे सहा महिनेच चालले. पण त्यानंतर ते बंद पडले. त्यामुळे धरणाची सुरक्षितता धोक्यात आहे. परिणामी हे ३९ लाख गेले कुठे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.यावेळी अधीक्षक अभियंता मिलिंद नाईक यांनी ज्या गावांना तिलारीचे पाणी देणे शक्य आहे, त्या गावांचा सर्व्हे करून देण्याची मागणी आहे. त्या गावांचा सर्व्हे करून दोन महिन्यात बैठक लावली जाईल तसेच कु डासे खुर्दमधील प्रश्नही सोडविला जाईल, असे सांगितले.
बैठकीची फलनिष्पती काय ?सरपंच सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांनी दक्षिण कोकण पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता मिलिंद नाईक, तिलारीचे कार्यकारी अभियंता राकेश धाकतोडे यांची भेट घेऊन तालुक्यातील शेतकरी व धरणग्रस्तांच्या व्यथा मांडल्या. तसेच प्रकल्पांतर्गत चाललेल्या अनागोंदी कारभाराचा पाढाही अधिकाऱ्यांसमोर वाचला. मात्र या चर्चेत ठोस कार्यवाही किंवा सकारात्मक बाब घडलीच नाही. सरपंचांनी पोटतिडकीने मांडलेल्या प्रश्नांवर अधिकाऱ्यांनी केवळ सारवासारव केली.