सिंधुदुर्ग : मालवण तालुक्यात अनेक समस्या निर्माण झाल्या असून सर्वसामान्य जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या वतीने तहसीलदार समीर घारे यांचे लक्ष वेधण्यात आले. येत्या १५ समस्या सोडविल्या न गेल्यास तहसीलदार कार्यालयावर धडक मोर्चा काढला जाईल, असा इशारा स्वाभिमानचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत यांनी दिला.तालुक्यातील विविध प्रश्नांबाबत स्वाभिमानने तहसीलदारांना निवेदन देत लक्ष वेधले. यावेळी तालुकाध्यक्ष मंदार केणी, सभापती सोनाली कोदे-तळाशीलकर, कृष्णनाथ तांडेल, नगरसेवक जगदीश गावकर, ममता वराडकर, चारुशीला आचरेकर, सरपंच संघटनेच्या अध्यक्षा स्नेहा केरकर, प्रतिमा भोजने, आबा हडकर, डॉ. जितेंद्र केरकर, अशोक चव्हाण आदी पदाधिकारी उपस्थित होते.मालवण कसाल आणि मालवण कुडाळ या दोन प्रमुख रस्त्याची चाळण झाली आहे. त्यामुळे वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे दोन्ही मागार्ची तात्काळ दुरुस्ती केली जावी, अशी मागणी करण्यात आली. तर, सिंधुदुर्ग किनारपट्टीवर परप्रांतीय बोटींचा धुमाकूळ सुरूच आहे. परप्रांतीयांच्या पर्ससीन नौकांच्या घुसखोरीमुळे पारंपरिक मच्छीमार हवालदिल बनला आहे.
याबाबत मच्छीमारांच्या तक्रारीनंतरही कोणतीही कारवाई नाही. त्यामुळे स्वाभिमानच्या या प्रमुख दोन मागण्या पूर्ण करण्याची १५ दिवसात कार्यवाही झाली नाही, तर महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले.