कणकवली : पोलिसांचा खबऱ्या असल्याची बतावणी करणाऱ्या इजाज दिलावर शेखचा आणखी एक कारनामा उघड झाला आहे. अपघातग्रस्त ट्रकच्या मालकाकडे पैशांची मागणी करीत त्याला धमकावल्याचा प्रकार समोर आला आहे.इजाज शेख याला बुधवारी पान टपरी चालकाकडून पोलिसांचा खबऱ्या आहे, असे सांगत 5 हजार 500 रूपये उकळल्या प्रकरणी कणकवली पोलीसानी अटक केली होती. मंगळवारी सायंकाळी ही घटना घडली होती.
याच दिवशी सकाळी कोल्हापुर जिल्ह्यातील राधानगरीनजीक फेजीवडे येथे गोव्याहून हरिद्वारला जाणारा कंटेनर रस्त्यालगत मातीत रुतला होता. तो बाहेर काढण्यासाठी ट्रक चालक जलेश्वर सिंग क्रेन आणण्यासाठी गेला. यावेळी क्लीनर ट्रक जवळ होता. इजाज शेख याने त्याला धमकावत मी पोलीस आहे असे सांगत ट्रकमधील कागदपत्रे मागितली. त्याने त्ती न दिल्याने स्वतः ट्रकमध्ये चढूण काढून घेतली. तसेच क्लीनर जवळून जलेंदर सिंग याचा मोबाईल नंबर घेतला.त्यानंतर सिंग याला फोन करून त्याच्याकडे पैशांची मागणी करत कागदपत्रे घेण्यासाठी कणकवलीत बोलावले.मंगळवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली होती. कणकवली पोलिसांनी कोल्हापुर पोलिसांना इजाज शेख याच्या बाबत अधिक माहिती घेण्यासाठी संपर्क केल्यावर ही बाब उघड झाली.त्यानंतर जलेश्वर सिंग गुरुवारी संध्याकाळी कणकवली पोलीस ठाण्यात दाखल झाला . तसेच त्याने सर्व घटना कणकवली पोलिसांना कथन केली. या घटनेबाबत अधिक तपास कणकवली सहाय्यक पोलिस निरीक्षक एस.एस.ओटवणेकर, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक बापू खरात करीत आहेत.13 ऑक्टोबर पर्यन्त पोलिस कोठडी !पानाच्या टपरी चालकाकडून पैसे उकळल्या प्रकरणी इजाज शेख याला कणकवली पोलिसांनी अटक करून गुरुवारी न्यायालयात हजर केले. यावेळी न्यायालयाने 13 ऑक्टोबर पर्यन्त पोलिस कोठडी दिली आहे. इजाज शेख सोबत आणखिन कोणी गुह्यात सहभागी आहे का? गुह्यात वापरलेली दुचाकी चोरीची आहे का? अशा गोष्टींचा तपास करण्यासाठी पोलिसांनी न्यायालयाकडे त्याच्या पोलिस कोठडीची मागणी केली होती. सरकारी पक्षाच्या वतीने अड़. गजानन तोड़करी यांनी काम पाहिले.