सिंधुदुर्ग : कोकण रेल्वे मार्गावरून मडगावहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या कोकणकन्या एक्सप्रेसमध्ये आढळलेल्या दोन बेवारस बॅगमधून रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी गोवा बनावटीच्या दारुच्या ७५० मिलीलीटरच्या ६० बाटल्या जप्त केल्या आहेत. या दारुची किंमत सुमारे ३३ हजार रुपये असून ती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ताब्यात देण्यात आली आहे.कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्यां गाड्यांमधून बेकायदेशीररित्या गोवा बनावटीच्या दारुची वाहतूक होत असल्याने त्या विरोेधात रेल्वे सुरक्षा बलाकडून मोहीम राबविली जात आहे.
कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या कोकणकन्या एक्सप्रेसमधील एस ५ डब्यात रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक अजयकुमार व हेड कॉन्स्टेबल अब्दुल सत्तार यांना दोन बेवारस बॅग आढळून आल्या. त्यांची तपासणी केली असता त्यात गोवा बनावटीच्या दारुच्या बाटल्या आढळल्या.जप्त केलेल्या दारुच्या बाटल्या रेल्वे सुरक्षा बलाकडून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ताब्यात देण्यात आल्या आहेत. रेल्वे सुरक्षा बलाच्या अनधिकृत दारू विरोधातील कारवाईमुळे खळबळ उडाली असून अशी वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणानले आहेत.