कुडाळ : झाराप येथे महामार्गावर दुचाकी व टँकर यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार ज्ञानेश्वर रामचंद्र्र ताम्हाणेकर (४२, रा. माणगाव-नमसवाडी) यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात बुधवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घडला.
अपघातग्रस्त झालेला टँकर.
माणगाव येथील ताम्हाणेकर हे त्यांच्या ताब्यातील दुचाकीवरून मुंबई-गोवा महामार्गावरून कुडाळच्या दिशेने जात होते. झाराप येथील सावित्री मंगल कार्यालयाच्यानजीक समोरून येणारा टँकर व दुचाकीची जोरदार धडक झाली. या अपघातात ताम्हाणेकर हे दुचाकीसह फरफटत जात महामार्गावर आदळले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. दुचाकीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.अपघात झाल्याचे कळताच स्थानिकांसह लोकप्रतिनिधी, सर्वपक्षीय पदाधिकाºयांनी घटनास्थळी धाव घेतली. हे अपघात केवळ येथील महामार्गाच्या सुरू असलेल्या कामामुळे होत आहेत.
दोन्ही बाजूने महामार्गाचे काम सुरू असताना वाहनांच्या सुरक्षिततेसाठी येथील महामार्ग अधिकारी व ठेकेदार दिलीप बिल्डकॉन कंपनीने कोणतीच उपाययोजना केली नाही, असा आरोप करीत आणखी किती बळी घेणार, असा सतंप्त सवाल यावेळी उपस्थित नागरिकांनी केला. कुडाळ पोलिसांनी अपघाताचा पंचनामा केला. अपघातस्थळी गर्दी झाल्याने वाहतूक कोंडी वाढत होती. पोलिसांनी वाढणारी कोंडी सोडवून महामार्ग खुला केला.अपघाताचे वृत्त कळताच मयत ताम्हाणेकर यांचे भाऊ घटनास्थळी दाखल झाले. भावाचा मृतदेह पाहून त्यांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटणारा होता. ताम्हाणेकर हे माणगावचे माजी जिल्हा परिषद सदस्य रमाकांत ताम्हाणेकर यांचे चुलत भाऊ असून, त्यांच्या पश्चात पत्नी, लहान मुलगा, मुलगी, भाऊ असा परिवार आहे. या अपघाताची नोंद करण्याचे काम कुडाळ पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत सुरू होते.ताम्हाणेकर यांचे माणगाव बाजारपेठेत हार्डवेअरचे दुकान असून, ते मनमिळावू स्वभावाचे व नेहमी हसतमुख असे व्यक्तिमत्व होते. त्यांच्या निधनामुळे माणगांव परिसरावर शोककळा पसरली आहे. झाराप येथे महामार्गाचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. परंतु, वाहनांच्या सुरक्षिततेसाठी कोणतीही उपाययोजना केलेली नाही.मातीचे मोठमोठे ढिगारे रस्त्याच्या दोन्ही बाजूला असूनही वाहनचालकांच्या सुरक्षिततेची कोणतीच खबरदारी ठेकेदार कंपनीने घेतलेली नाही. महामार्गाचे अधिकारीही सुशेगात आहेत. काम सुरू झाल्यापासून अपघातांची मालिकाच सुरू झाली असून, आजपर्यंत झालेल्या पाच अपघातात तिघांना आपल्या प्राणास मुकावे लागले आहे.ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा!महामार्गाचे काम करणाºया ठेकेदार कंपनीच्या काम करण्याच्या चुकीच्या पध्दतीमुळे हा अपघात घडला आहे. यात ताम्हाणेकर यांचा मृत्यू झाला असल्याने ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी आम्ही सर्वपक्षीय कुडाळ पोलीस निरीक्षक यांच्याकडे करणार असल्याचे शिवसेनेचे कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक यांनी सांगितले.