सिंधुदुर्गनगरी : ओरोस भावनगर येथील भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या गिताली किशोर पाडावे (३०, चिंदर, ता. मालवण) या विवाहितेने शुक्रवारी पहाटे तीनच्या सुमारास आत्महत्या केली. आत्महत्ये मागचे कारण समजू शकलेले नाही. दरम्यान, या प्रकरणाचा अधिक तपास सिंधुदुर्गनगरी सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदाताई पाटील करीत आहे.मालवण तालुक्यातील चिंदर येथील किशोर मोहन पाडावे सिंधुदुर्ग पोलीस विभागात चालक म्हणून कार्यरत आहेत. सध्या ते सिंधुदुर्गनगरी मुख्यालय येथे कार्यरत असून गेली दोन वर्ष आपल्या पत्नीसोबत ओरोस भावनगर येथे भाड्याच्या खोलीमध्ये राहत आहेत.
गीताली पाडावे या त्यांच्या पत्नी असून गुरुवारी पहाटे तीनच्या सुमारास किशोर यांना आपल्या घरात आवाज आला त्याबरोबर ते उठून आतल्या खोलीत गेले असता आतील खोलीत त्यांची पत्नी गीताली पंख्याला ओढणीच्या सहाय्याने गळफास लावल्याच्या स्थितीत आढळून आली. लागलीच त्यांनी शेजाऱ्याच्या सहाय्याने तिला खाली उतरवत येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, तत्पूर्वी त्या मृत झाल्या होत्या.याबाबतची माहिती जिल्हा रुग्णालयाच्यावतीने पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदाताई पाटील यांच्या पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेत पाहणी करून पंचनामा केला. मात्र, या आत्महत्येमागील कारण अस्पष्ट असून अधिक तपास पाटील या करत आहेत.
गीताली आणि किशोर यांचा विवाह दहा वर्षांपूर्वी झाला होता. त्यांना आठ वर्षाची एक मुलगी आणि तीन वर्षांचा एक मुलगा आहे. पूर्वाश्रमीच्या गीताली निरवडेकर या सावंतवाडी सालईवाडा येथील आहेत. त्यांचे पती किशोर हे पोलीस विभागात चालक म्हणून कार्यरत आहेत.
सध्या ते वैद्यकीय रजेवर घरीच होते. गुरुवारी रात्री जेवणानंतर ही सर्व मंडळी एकत्रच खोलीत झोपली होती. मात्र, त्यानंतर गीताली यांनी केव्हा जाऊन गळफास लावून घेतला हे समजू शकले नाही. तसेच त्यांनी आत्महत्या का केली याचे कारणही सायंकाळपर्यंत स्पष्ट होऊ शकले नाही.