कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्याबरोबरच इतर भागातील खेळाडूंच्या कला गुणाना वाव देण्यासाठी येथील कुणाल बागवे कला, क्रीड़ा मंडळाच्यावतीने गेली अकरा वर्षे भव्य कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात येते. यावर्षी ही स्पर्धा २३ ते २५ फेब्रुवारी या कालावधीत येथील विद्यामंदिरच्या पटांगणावर १६ नामवंत निमंत्रित संघांच्या उपस्थितीत प्रकाश झोतात होणार असल्याची माहिती युवा नेते संदेश पारकर यांनी येथे दिली.कणकवली येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी स्पर्धा आयोजन समिती अध्यक्ष रूपेश नार्वेकर, हरीश निखार्गे, महैंद्र मराठे, शशांक बोर्डवेकर, परेश बागवे, निनाद दीपनाईक, संतोष पूजारे आदी मंडळाचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.संदेश पारकर म्हणाले, कुणाल बागवे, अमित मुद्राळे, प्रमोद परब, सदानंद सावंत यांच्या स्मृती प्रित्यर्थ गेली अकरा वर्षे त्यांची मित्रमंडळी एकत्र येऊन या भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन करीत आहेत. कुणाल बागवे मित्रमंडळ क्रीड़ा, सामाजिक,सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रात अनेक उपक्रम राबवित असते. कणकवली बरोबरच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव या मंडळाने राज्य तसेच देशपातळीवर नेण्यासाठी सातत्याने प्रयत्न सूरु ठेवले आहेत.दरवर्षी प्रमाणेच यावर्षी ' कुणाल चषक २०१८ ' या कबड्डी स्पर्धेचे आयोजन हे मंडळ करीत असून तिन दिवस कबड्डीचा थरार कणकवलीत क्रीड़ा रसिकाना पहायला मिळणार आहे. सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी फेडरेशनच्या मान्यतेने ही स्पर्धा होणार आहे. या ठिकाणी प्रेक्षकांसाठी ख़ास गॅलरीची व्यवस्था करण्यात येणार आहे. तर महिलांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्थाही असणार आहे. त्याचबरोबर क्रीड़ा रसिकांसाठी लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे.२३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत स्पर्धेचे उदघाट्न होईल. तर २५ फेब्रुवारी रोजी रात्री उशिरा पारितोषिक वितरण करण्यात येईल. स्पर्धेतील विजेत्या संघास रोख रूपये ४१ हजार व कुणाल चषक, उपविजेत्या संघास रोख रूपये ३१ हजार व चषक तर उपांत्य फेरितील पराभूत दोन संघाना प्रत्येकी रोख रूपये १० हजार व चषक देवून गौरविण्यात येणार आहे.सर्वोत्कृष्ट खेळाडू रोख रूपये ४००० , उत्कृष्ट पकड़ रोख रूपये ३०००, उत्कृष्ट चढ़ाई रोख रूपये ३००० तसेच इतरही आकर्षक बक्षीसे दिली जाणार आहे. तसेच या सर्व विजेत्यांना आकर्षक चषक दिला जाणार आहे. लाल मातीतील या खेळाच्या महाउत्सवात सिंधुदूर्गातील क्रीड़ा रसिकानी सहभागी व्हावे असे आवहनही संदेश पारकर यांनी यावेळी केले.
मंडळाची उत्कृष्ट कामगीरी !कुणाल बागवे कला, क्रीड़ा मंडळाला महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचा सातत्यपूर्ण कबड्डी स्पर्धेचे आयोजक संस्था २०१५ चा पुरस्कार मिळाला आहे. तसेच सिंधु भूमि फाऊंडेशनचा ' सर्वोत्कृष्ट क्रीड़ा मंडळ' हा पुरकारही मिळाला आहे. या मंडळाने केलेल्या उत्कृष्ट कामगिरिची ही पोचपावती आहे. असे यावेळी संदेश पारकर यांनी सांगितले.