सिंधुदुर्ग : येथील भंडारी कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी सीमेवर भारतभूमीच्या रक्षणासाठी लढणाऱ्या सैनिकांसाठी रक्षाबंधनानिमित्त तब्बल ५ हजार २५० राख्या तयार केल्या आहेत. गेला दीड महिना मेहनत घेऊन विद्यार्थिनींनी सुबक अशा विविध प्रकारच्या राख्या स्वत:च्या हाताने बनविल्या असून या राख्या जम्मू काश्मीर, पंजाब, अरुणाचल प्रदेश, राजस्थान, मणिपूर, पश्चिम बंगाल, आसाम तसेच कारवार, नेव्ही डॉक व मुंबई नेव्ही आदी ठिकाणच्या सैनिकांना पाठविल्या आहेत.या राख्यांचे प्रदर्शन शनिवारी महाविद्यालयाच्या प्रांगणात मांडण्यात आले. यावेळी विद्यार्थी व विद्यार्थिनींनी भारत माता की जय, वंदे मातरम, भारतीय जवानांचा विजय असो, जय जवान, जय किसान अशा घोषणा देऊन महाविद्यालय परिसर दणाणून सोडला.
यावेळी प्राचार्या समिता मुणगेकर, पवन बांदेकर, स्नेहल पराडकर, गणेश सावंत, अपूर्वा देसाई, संपदा कोयंडे, ज्योती सातार्डेकर, एस. डी. वराडकर आदी उपस्थित होते. यानंतर या राख्या पोस्टाच्या माध्यमातून सैनिकांचे तळ असलेल्या ठिकाणांवर पाठविण्यात आल्या.ह्यरक्ताचे नाते असलेला भाऊ फक्त बहिणीचे रक्षण करतो. मात्र आपण भारतमातेचे रक्षण करीत आहात व देशसेवेचे पवित्र कार्य आपणाकडून अविरत घडत राहो ही ईश्वरचरणी प्रार्थनाह्ण असा शुभसंदेशही विद्यार्थिनींनी राख्यांसोबत सैनिकांना पाठविला आहे.
या उपक्रमासाठी पवन बांदेकर यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. यावेळी शंभरहून अधिक राख्या बनविणाऱ्या १३ विद्यार्थिनींना भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. या उपक्रमाबद्दल प्राचार्या समिता मुणगेकर यांनी विद्यार्थिनींचे व शिक्षकांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.सैनिकांसाठी राख्या बनविण्यासाठी विद्यार्थिनींचे गट तयार करण्यात आले. गतवर्षीप्रमाणे यावर्षीही सर्व विद्यार्थिनींनी मिळून विक्रमी अशा तब्बल ५ हजार २५० राख्या बनविल्या.
यामध्ये शालू रोशन कुमावत (१०००), नेहा जगदीश तिरोडकर (७००), श्वेता दिनेश बिरमोळे (३२०) या विद्यार्थिनींनी सर्वाधिक राख्या बनविल्या. बांदेकर यांनी या उपक्रमाची माहिती विशद केली. तसेच सहभागी विद्यार्थिनींनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी व विद्यार्थी उपस्थित होते.