सिंधुदुर्ग : मुंबईकडून गोव्याकडे जाणाऱ्या झाराप-पत्रादेवी बायपास महामार्गावरील इन्सुली-डोबवाडी येथे सोमवारी दुपारी भीषण आग लागून सुमारे १५ एकर क्षेत्रातील ६०० हून अधिक काजू कलमे खाक झाली. यामध्ये १० हून अधिक शेतकऱ्यांचे ६ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
सतत तीन वर्षे याठिकाणी वीज वितरण कंपनीच्या रोहित्रातून स्पार्किंग होऊन आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीच्या भोंगळ काराभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.शेतकऱ्यांनी याठिकाणी मेहनतीने काजू बागायती फुलविल्या आहेत. सोमवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास याठिकाणी असलेल्या रोहित्रामध्ये स्पार्किंग झाल्याने आग लागण्याची घटना घडली.
दुपारची वेळ असल्याने तसेच बागायतीमध्ये असलेल्या गवत व पालापाचोळयामुळे आगीने रौद्ररुप धारण केले. आगीने झालेल्या धुरामुुळे महामार्गावरील वाहतुकही काही काळ खोळंबली होती.यामध्ये शेतकरी उल्हास नारायण सावंत, अशोक नारायण सावंत, रामचंद्र अंकुश सावंत, विजय पेंढुरकर, अशोक पेंढुरकर, आप्पा पेंढुरकर, अर्जुन पेंढुरकर, लाडशेट पेंढुरकर, आनंद पेंढुरकर, लक्ष्मण पेंढुरकर, अमित सावंत यांची सुमारे ६०० हूून अधिक काजू कलमे खाक झाली आहेत. यावेळी स्वागत नाटेकर, अमित सावंत, बाप्पल धुरी, भाऊ कुडव, गोट्या सावंत यांनी मदतकार्य केले.
शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकटआग लागल्याच्या ठिकाणी वस्ती नसल्याने आग लागल्याची माहिती उशिराने शेतकऱ्यांना समजली. मात्र आगीने रौद्ररुप धारण केल्याने शेतकऱ्यांना आग आटोक्यात आणणे कठीण झाले. शेतकरी तसेच वाहनधारकांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र १५ एकर क्षेत्रातील काजू बागायती पूर्णपणे खाक झाली. ऐन काजू हंगामात काजू बागायती जळाल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे.