वैभववाडी : जन्मत:च कलात्मकता अंगी असलेला आणि सतत काहीतरी नवनिर्मितीचा ध्यास घेतलेल्या एडगाव येथील सातवीतील निनाद विनोद रावराणे याने पुठ्ठा आणि टाकाऊ वस्तूंचा वापर करून हुबेहूब जेसीबी साकारला आहे. निनादचा जेसीबी केवळ मॉडेल नसून त्याची खऱ्या जेसीबीप्रमाणे हालचाल होते. पंधरा दिवसांच्या खटाटोपाअंती जेसीबी बनविण्याचा प्रयत्न यशस्वी झाला असून त्याच्या नवनिर्मितीची तालुक्यात चर्चा होऊ लागली आहे.निनाद हा सोनाळीतील इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकत आहे. शाळेचा अभ्यास आणि खेळाबरोबरच रिकाम्या वेळेत सतत काहीतरी नवीन करण्यात रममाण असणाऱ्या निनादच्या अंगी कलात्मकता आणि नवनिर्मिती ठासून भरलेली दिसून येते.
त्यामुळेच नवव्या वर्षी गणपतीची अतिशय आकर्षक अशी मूर्ती बनवून त्याने आपल्यातील कौशल्यगुण कुटुंबीयांना दाखवून दिले होते. त्यानंतर किल्ला, डंपर यासारख्या लक्ष वेधून घेणाऱ्या प्रतिकृती व अनेक वस्तू त्याने बनविल्या. आता मात्र त्याने कल्पनाशक्ती व आत्मविश्वासाच्या बळावर चक्क जेसीबी तयार करून आपले वेगळेपण सिद्ध केले आहे.निनादच्या कुटुंबाची पार्श्वभूमी बांधकाम व्यवसायाची आहे. वडील विनोद आणि काका सुनील रावराणे हे दोघे बांधकाम व्यावसायिक असल्याने व्यवसायासाठी आवश्यक जेसीबी, रोलर, ट्रॅक्टर, डंपर यासारखी यंत्रसामग्री त्यांच्याकडे उपलब्ध आहे. त्या यंत्रसामग्रीच्या निरीक्षणातून निनादला जेसीबी बनविण्याची कल्पना सुचली. त्यानंतर त्याने पंधरा दिवस साहित्याची जुळवाजुळव करून हा जेसीबी तयार केला आहे.जेसीबी बनविण्यासाठी त्याने दोन टाकाऊ पुठ्ठे, १४ सिरींज, केरसुणीचे हीर, घरातील जुने दहा स्क्रू, दोन क्रॅप पुठ्ठे अशा जवळपास टाकाऊ वस्तूंचा वापर केला आहे. या वस्तूंचा अत्यंत खुबीने वापर करून अगदी सामान्य जेसीबीला असणारे बकेट, बुम, लोडर, स्टेपिलायझर, चालक केबीनसह हुबेहूब रचना केली आहे.
विशेष म्हणजे रंग आणि घरच्या जेसीबीचा नोंदणी क्रमांकही निनादने जेसीबीला दिला असून खऱ्या जेसीबीप्रमाणेच त्याच्या जेसीबीचे बकेट किंवा लोडरची हालचाल होते. त्याच्या जेसीबीची संपूर्ण हालचाल सिरींज व सलाईनच्या पाईपवर अवलंबून आहे.निनादच्या निर्मितीचे तालुक्यात कुतूहलआपण बनविलेल्या जेसीबीच्या हालचालीचे निनाद येणाऱ्या प्रत्येकाला प्रात्यक्षिक करून दाखवितो. त्यामुळे निनादची नवनिर्मिती असलेला पुठ्ठ्यांचा हालचाल करणारा जेसीबी हा तालुक्यात कुतूहलाचा विषय ठरला असून त्याच्या नवनिर्मितीचे पाहणाऱ्याकडून कौतुक होत आहे.