कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ६० हजार एकर पडीक जमीन आहे. या जमिनीवर मोठ्या प्रमाणात काजू लागवड करून जिल्ह्याची कृषी अर्थव्यवस्था काजूप्रधान बनवा, असे आवाहन जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी कुडाळ येथील सिंधु कृषी व पर्यटन महोत्सवात केले. काजू पीक हे भविष्यकाळ उज्ज्वल करणारे पीक असून, हे पीक जिल्ह्यात प्रथम स्थानावर येण्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केले.
कुडाळ येथे सिंधुदुर्ग जिल्हा परिषद व कृषी पशुसंवर्धन विभागाच्यावतीने आयोजित केलेल्या सिंधु कृषी औद्योगिक पशुपक्षी, मत्स्य व्यवसाय व पर्यटन महोत्सवामध्ये जिल्हा परिषद व जिल्हा बँक यांच्यावतीने आयोजित काजू परिषदेत ते बोलत होते. या परिषदेचे उद्घाटन जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्या हस्ते झाले.यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्मा सावंत, उपाध्यक्ष रणजित देसाई, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, जिल्हा बँक संचालक विद्याप्रसाद बांदेकर, कुडाळ नगरपंचायत सभापती संध्या तेरसे, डॉ. प्रसाद देवधर, मार्गदर्शक योगेश परूळेकर, चंद्रशेखर देसाई, सुरेश बोवलेकर, विजय सावंत, राजाराम माळवणकर, बाळकृष्ण गाडगीळ, जिल्हा बँकेचे मुख्याधिकारी अनिरूध्द देसाई आदी उपस्थित होते.चौधरी म्हणाले, संपूर्ण भारतात सर्वात जास्त काजू लागवड व काजू पीक घेणारा सिंधुदुर्ग जिल्हा असून या जिल्ह्याची कृषी व्यवस्था काजूप्रधान झाली पाहिजे. काजू पीक वाढल्यास भविष्यात दहा वर्षांत जिल्हा प्रगतीपथावर जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कमीत कमी खर्चात जास्त फायदा देणाऱ्या काजू पिकाकडे शेतकऱ्यांनी वळणे अत्यंत आवश्यक आहे. भारतात सर्वात जास्त काजूचे उत्पादन सिंधुदुर्गात होऊनही येथील कारखान्यांना केवळ ७० टक्केच काजू उपलब्ध होतो. त्यामुळे काजूची बाहेरच्या देशातून आयात करावी लागते, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.जिल्ह्यात गेल्यावर्षी ६० हजार एकर पडीक जमीन होती. आता ती ५२ टक्क्यांपर्यंत राहिली आहे. आता या जिल्ह्यात पडीक जमीन हा शब्दच राहू नये, यासाठी सर्वांनी जास्तीत जास्त जमीन लागवडीखाली आणावी, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले. गेली चार वर्षे सिंधु कृषी पशुपक्षी महोत्सवाचे नियोजनबद्धरित्या आयोजन करून शेती, बागायतदारांसाठी विविध योजना राबविणाऱ्या जिल्हा बँकेचे चौधरी यांनी अभिनंदन केले.
कमी व्याजदरात कर्ज देणार : सावंतकाजू पीक हे ऊस व इतर पिकांपेक्षा जास्त उत्पन्न देणारे आणि कोणत्याही प्रकारचा धोका नसलेले पीक आहे. जिल्ह्यात काजू लावगड करणाऱ्या बागायतदार व शेतकऱ्यांना जिल्हा बँकेच्यावतीने अल्प व्याज दराने कर्जपुरवठा करण्यात येईल, असे जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत म्हणाले.काजू पीकच श्रेष्ठ : चौधरीसध्या शेतकऱ्यांना आपल्या शेतातील पीक, फळे बाजारातील ग्राहकांपर्यंत घेऊन जावी लागत आहेत. तसेच मोठ्या प्रमाणात तोटाही सहन करावा लागत आहे. काजू असे पीक आहे की त्याची सहज आणि चांगल्या दराने विक्री होते. त्यामुळे काजू पीक श्रेष्ठ असल्याचे मत चौधरी यांनी व्यक्त केले.