मालवण : कालावल खाडीपात्रातील वाळू उत्खनन पट्ट्यात महसूल प्रशासनाने सलग दुसऱ्या दिवशी धडक तपासणी मोहीम राबविली. तहसीलदार समीर घारे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने होडीतून तोंडवळी वायंगणी किनारपट्टीवरील उत्खनन करणाऱ्या होड्या व वाळू रॅम्पची तपासणी केली असता वाळू उत्खननाच्या चार होड्या बेवारस स्थितीत सापडून आल्या आहेत.कालावल खाडीपात्रात तहसीलदारांच्या नेतृत्वाखाली नायब तहसीलदार साईनाथ गोसावी, मंडळ अधिकारी मिलिंद पारकर, तलाठी व्ही. व्ही. कंठाळे या पथकाने गुरुवारी दुपारी तोंडवळी व कालावल येथील वाळू पट्ट्यात तपासणी मोहीम राबविली.
तहसीलदार घारे यांनी स्वत: होडीतून खाडीपात्रात उतरत वाळू उत्खनन सुरू असलेल्या होड्यांंची पाहणी केली. वाळू उपसा सुरू आहे, त्या ठेक्याची मुदत व पास दोन्ही शिल्लक असल्याचे तपासणीत स्पष्ट झाले. वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रक व डंपर यांच्या क्षमतेनुसार नियमानुसार वाळू पास देण्यात येत असल्याचेही दिसून आले.
या तपासणी दरम्यान मसुरे व कालावल किनाऱ्यावर एकूण चार होड्या बेवारस स्थितीत सापडून आल्या. यातील एका होडीत वाळू साठा शिल्लक होता. या सर्व होड्यांची तपासणी केली जाणार असून मालकांचा शोध घेतला जात आहे.जर या होड्यांचा वापर अनधिकृत वाळू उत्खननासाठी होत होता हे स्पष्ट झाल्यास कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदारांनी दिली. तसेच महसूल विभागाकडून यापुढेही सर्वच वाळू पट्ट्यात तपासणी मोहीम अधिक तीव्रपणे राबविण्यात येणार असल्याचेही तहसीलदार यांनी सांगितले.