सुधीर राणे
सिंधुदुर्ग : कणकवली नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने निर्विवाद वर्चस्व मिळविले असून समीर नलावडे यांनी नगराध्यक्ष पदावर विराजमान होण्याचा मान मिळविला आहे.
आता उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवक निवड होणार असून या पदावर कोणाची वर्णी लागणार याबाबत कणकवलीवासीयांना उत्सुकता लागून राहिली आहे. त्यामुळे त्याबाबत तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.कणकवली नगरपंचायतीच्या चुरसीच्या झालेल्या निवडणुकीत महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने बहुमत मिळविले आहे. तर थेट नगराध्यक्ष निवडणुकीत या आघाडीचे समीर नलावडे निवडून आले आहेत.
महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अभिजीत मुसळे, सुप्रिया नलावडे, कविता राणे, विराज भोसले, रवींद्र गायकवाड, उर्मी जाधव, संजय कामतेकर, मेघा गांगण, गणेश हर्णे, प्रतीक्षा सावंत तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अबिद नाईक हे आघाडीचे नगरसेवक निवडून आले आहेत.
शिवसेना- भाजप युतीने आपले ६ नगरसेवक निवडून आणले आहेत. यामध्ये भाजपचे राधाकृष्ण उर्फ रुपेश नार्वेकर, मेघा सावंत, सुमेधा अंधारी तर शिवसेनेचे सुशांत नाईक, मानसी मुंज व माही परुळेकर यांचा समावेश आहे.कणकवली नगरपंचायतीत महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे बहुमत असले तरी मागे घडलेल्या काही घटनांमुळे तसेच राजकीय नेतृत्वासमोर निर्माण झालेले पेच पाहता यावेळी नगरसेवकांचा गट स्थापन करण्याची खबरदारी घेण्यात आली आहे.
या आघाडीच्यावतीने नगरसेवकांचा गट स्थापन करण्यात आला असून स्वाभिमान पक्षाचे नगरसेवक संजय कामतेकर यांची गटनेतेपदी सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. तर शिवसेना-भाजप युतीनेही आपल्या नगरसेवकांचा गट स्थापन केला आहे. युतीच्या गटनेतेपदी सुशांत नाईक यांची निवड करण्यात आली आहे.प्रत्येकी अडीच वर्षे कालावधीसाठी दोघा नगरसेवकांना उपनगराध्यक्ष पदाची संधी मिळण्याची शक्यता आहे. गणेश हर्णे, अभिजीत मुसळे, मेघा गांगण या अनुभवी नगरसेवकांना उपनगराध्यक्ष बनण्याची संधी मिळणार की नवोदित नगरसेवकांपैकी कोणाला मिळणार? याबाबत कणकवलीतील नागरिकांना उत्सुकता लागून राहिली आहे.त्याचबरोबर नगरपंचायतीतील महत्त्वाचे समजल्या जाणाऱ्या बांधकाम समिती सभापतीपदी कोणाची वर्णी लावण्यात येणार? हेही तितकेच महत्त्वाचे आहे. इतर विषय समिती सभापतीही निवडावे लागणार आहेत. त्यादृष्टीने नगरसेवकांकडून आतापासूनच मोर्चेबांधणी केली जात आहे. त्यामुळे अंतर्गत घडामोडींना वेग आला आहे.
स्वीकृत नगरसेवक निवडीकडे लक्षकणकवली नगरपंचायतीत दोन स्वीकृत नगरसेवक निवडायचे आहेत. महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला एक तर शिवसेना-भाजप युतीला एक स्वीकृत नगरसेवक निवडता येणार आहे. त्यामुळे स्वीकृत नगरसेवक कोण बनणार ? याबाबतही शहरात चर्चा रंगली आहे.
नगरपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या काहीजणांना त्यांचे अर्ज मागे घेण्यासाठी स्वीकृत नगरसेवक बनविण्याचे आश्वासन राजकीय नेत्यांनी दिले होते. हे आश्वासन निवडणुकीनंतर आता पूर्ण केले जाणार का? हेही तितकेच महत्त्वाचे आहे.