सिंधुदुर्ग : कणकवली नगरपंचायत निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध झाली़ त्यानुसार उमेदवारांना मंगळवारी चिन्ह वाटप करण्यात आले. थेट नगराध्यक्षपदाचे भाजपचे उमेदवार संदेश पारकर यांना कमळ, स्वाभिमान पक्षाचे समीर नलावडे यांना कपबशी, काँग्रेसचे विलास कोरगांवकर यांना हात तर कणकवली विकास आघाडीचे राकेश राणे यांना नारळ अशी चिन्हे देण्यात आली.स्वाभिमान पक्षाच्या सर्व नगरसेवक पदाच्या उमेदवारांना जग ही एकच निशाणी मिळाली आहे. तर प्रभाग १० मध्ये अवैध ठरलेल्या शितल मांजरेकर व स्वाती काणेकर या दोन्ही उमेदवारांनी निर्णयाविरोधात अपील केल्यामुळे त्या प्रभागातील चिन्ह वाटप प्रक्रिया २८ मार्चपर्यंत राखून ठेवण्यात आली आहे.निवडणूक निर्णय अधिकारी नीता सावंत-शिंदे, तहसीलदार वैशाली माने, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अवधूत तावडे यांच्या उपस्थितीत येथील तहसील कार्यालयात चिन्ह वाटप प्रक्रिया करण्यात आली. या प्रक्रियेला सर्वच राजकीय पक्षांचे उमेदवार व अपक्ष उमेदवार उपस्थित होते़.
राष्ट्रीय तसेच प्रादेशिक पक्षांना चिन्ह वाटप झाल्यानंतर नगरपंचायत निवडणूक लढविणाऱ्या कणकवली विकास आघाडी तसेच अपक्ष उमेदवारांना हॅट, मेणबत्ती, कॅमेरा, शिट्टी अशी चिन्हे देण्यात आली आहेत.