कुडाळ : कालेली येथील शासकीय जंगलात अवैधरित्या वृक्षतोड करून लाकडाची चोरी करणाऱ्या तिघांना पकडताना एका संशयित चोरट्याने कालेलीचे वनरक्षक सुनील भंडारे यांना कुऱ्हाडीने हल्ला करून जखमी केले. अवैध वृक्षतोड तसेच वनरक्षकास दुखापत केल्याप्रकरणी कालेली-माणगाव येथील तिघा संशयितांवर कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत कालेलीचे वनरक्षक सुनील भंडारे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, शुक्रवारी ते व त्यांचे सहकारी वनमाळी, तेली हे नेहमीप्रमाणे त्यांच्या कार्यक्षेत्रातील मोरे या गावातील शासकीय जंगलमय भागात गस्त घालत होते. यावेळी जंगलात मोठ्या प्रमाणात चोरट्या पद्धतीने वृक्षतोड होत असल्याचे निदर्शनास आले.
याच दिवशी भंडारे यांना त्यांच्या मोबाईलवर फोन आला. फोन करणाऱ्या व्यक्तीने भंडारे यांना कालेली येथील वन सर्व्हे नं. ५२ कक्ष क्र. ११५ (अ) या शासकीय जंगलात झाडांची तोड होत असून याची खात्री करा, असे सांगितले. या माहितीनुसार भंडारे व माणगावचे वनरक्षक गुरूनाथ देवळी या दोघांनीही तत्काळ दुचाकीने कालेली येथील वनक्षेत्र गाठले. त्यांचे सहकारी वनमाळी हेही तेथे आले.जंगलातून वृक्षतोडीचा आवाज येत असल्याने चोरट्यांना पकडण्यासाठी भंडारे व देवळी यांनी सापळा रचला व लपून बसले. यावेळी वृक्षतोड करणाऱ्यांपैकी तिघेजण वृक्षाचा एक नग घेऊन खाली उतरत असल्याचे दिसले. भंडारे व देवळी यांनी या तिघांनाही पकडण्यासाठी झडप घातली. मात्र, त्यातील एका व्यक्तीने भंडारे यांच्या अंगावर धावून जात हातातील कुऱ्हाडीने त्यांच्या कानाच्या मागे, डाव्या हाताच्या अंगठ्याकडे तळहाताला दुखापत केली व हिसका देऊन पळून गेला. तरीही देवळी आणि भंडारे यांनी अन्य दोघांना पकडून माणगाव वनपरिमंडळ येथे आणले.संशयित ताब्यातया प्रकरणी भंडारे यांनी कुडाळ पोलिसांत तक्रार दिली असून संशयित आरोपी मधुकर परब, महेश घाडी व बाळकृष्ण घाडी (रा. कालेली) यांच्यावर अवैधरित्या वृक्षतोड तसेच वनरक्षकास जखमी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितांना वनखात्याने ताब्यात घेतले असून अधिक तपास माणगाव पोलीस दूरक्षेत्राचे विजय चव्हाण करीत आहेत.