सिंधुदुर्ग : गुरू हा खऱ्या अर्थाने शिष्याला मार्ग दाखवितो. देवापेक्षाही गुरू महत्त्वाचा आहे. सावित्रीबार्इंनी तत्कालीन परिस्थितीशी सामना करीत स्त्रियांना शिक्षणाचे द्वार खुले करून दिले. यामागे त्यांचे गुरू ज्योतिबा फुले यांचे फार मोठे योगदान आहे. कोणत्याही क्षेत्राचा विकास घडवायचा असेल तर प्रत्येकाचे सहकार्य महत्त्वाचे आहे.
धर्माची, जातीची, रूढीची बंधने तोडण्याची ताकद सावित्रीबाई फुले यांच्याकडे असल्याने आज समाजात स्त्री मानाने उभी राहू शकली, असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या व डॉ. पी. व्ही. मंडलिक ट्रस्टच्या प्रतिनिधी अॅड. सुरेखा दळवी यांनी केले.देवगड तालुक्यातील मिठमुंबरी ग्रामपंचायत, महिला बचतगट महासंघ तसेच पंचशील महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने करूया सावित्रीबार्इंचा जागर कार्यक्रम तसेच महिला व युवतींना प्रशिक्षण देण्याचा उपक्रम सोमवारी मिठमुंबरी येथील सागरी किनाऱ्यांवरील सुरुचे बन येथे झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच रिमा मुंबरकर उपस्थित होत्या.यावेळी व्यासपीठावर डॉ. पी. व्ही. मंडलिक ट्रस्टच्या संचालिका साधना वैराळे, जिल्हा परिषद सदस्या सावी लोके, पंचशील महिला मंडळाच्या अध्यक्षा तथा नशाबंदी महामंडळाच्या जिल्हा संघटक अर्पिता मुंबरकर, बचतगट महासंघाच्या अध्यक्षा किशोरी खवळे, कुणकेश्वरच्या माजी सरपंच दीपिका मुणगेकर, महिला बालकल्याण विभागाच्या मुख्यसेविका पाताडे, मुंब्रादेवी विकास मंडळ मुंबईचे सचिव गणेश गावकर, ग्रामपंचायत सदस्या दक्षता मुंबरकर, लक्ष्मी तारी, रसिका गावकर, पल्लवी डामरी, ग्रामसेवक राजेश बागवाले आदी उपस्थित होते.महिलांच्या प्रगतीसाठी अनेक उपक्रमसरपंच रिमा मुंबरकर यांनी गावातील महिलांना सक्षम करण्यासाठी आज करूया सावित्रीबार्इंचा जागर हा उपक्रम हाती घेतला असून महिलांना प्रत्येक क्षेत्रात संधी उपलब्ध व्हावी असा प्रयत्न सुरू आहे. खाद्य महोत्सवाच्या माध्यमातून त्यांना पर्यटनातून व्यवसायाची संधी निर्माण करण्याचा एक मार्ग दाखविला आहे. अनेक उपक्रम आम्ही महिलांच्या प्रगतीसाठी हाती घेत आहोत, असेही त्या म्हणाल्या.