सिंधुदुर्ग : रत्नागिरी येथे कोकण विद्यापीठ झालेच पाहिजे अशी मागणी कला व वाणिज्य महाविद्यालय खारेपाटणच्या विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.विदर्भ व मराठवाडा येथे विद्यापीठ असून पश्चिम महाराष्ट्रात तीन विद्यापीठे आहेत. सोलापूर जिल्ह्यासाठी एक विद्यापीठ आहे. मग कोकणात विद्यापीठ का नको? असा सवाल अनिकेत सौंदळकर, भूषण पाकळे, हर्षद पोहले, राकेश गेहलोत, सायली शिंदे, प्रथमेश पांचाळ, मयुरी कुळकर्णी, प्रणाली पांचाळ आदी विद्यार्थ्यांनी केला आहे.या संबंधीचे निवेदन कणकवली प्रांताधिकारी कार्यालयातील शिरस्तेदार पी. बी. पळसुले यांना खारेपाटण महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी दिले. या निवेदनात म्हटले आहे की, घिसाडघाईने पेपर तपासत असल्याने उत्तरपत्रिकांचे अचूक मूल्यमापन होत नाही. त्यामुळे पुनर्मूल्यमापन करून घेणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.गहाळ झालेल्या उत्तरपत्रिकांचे काय करायचे हा तर मोठा प्रश्न आ वासून उभा आहे. त्यामुळे आमचे भवितव्य अंधकारमय झाले आहे. गेल्या २-३ वर्षांत अनुतीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी पुनर्मूल्यमापनासाठी अर्ज केले तेव्हा त्यातील बहुसंख्य विद्यार्थी उत्तीर्ण झाले.त्यामुळे विद्यापीठाची विश्वासार्हता संपुष्टात आली आहे, असा आरोपही विद्यार्थ्यांनी केला आहे. त्यामुळे रत्नागिरी, सिंधुदुर्ग व रायगडमधील विद्यार्थ्यांना रत्नागिरी हे मध्यवर्ती ठिकाण होईल व विद्यापीठाशी संपर्क साधणे सोयीचे होईल, असे म्हटले आहे. निवेदनावर आठ विद्यार्थ्यांच्या सह्या आहेत.
विद्यापीठ झाले नापासदोडामार्ग ते मुंबई हे अंतर सातशे किलोमीटर आहे. मुंबई विद्यापीठ कोकणच्या एका टोकाला आहे. तेथे विद्यापीठात जाऊन काम करून यायला सहज चार पाच दिवस जातात व हजारो रुपये खर्च होतात. शिवाय प्रचंड गर्दी असल्यामुळे दोन- चार तास आपल्या कामासाठी रांगेत उभे रहावे लागते.
विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयात उत्तम शैक्षणिक दर्जाबरोबर उत्तम प्रशासन ठेवणे, संशोधन करणे, योग्य वेळी परीक्षा घेऊन पारदर्शकपणे कारभार करणे ही विद्यापीठाची प्रमुख कामे आहेत. पण त्यात मुंबई विद्यापीठच नापास झाले आहे, असा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.