सिंधुदुर्गनगरी : जिल्हयात पावसा अभावी व परतीच्या पावसाने भातशेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी पुरते संकटात सापडले असून त्यांना भातशेतीची नुकसान भरपाई मिळणे आवश्यक आहे.त्याअनुषंगाने राज्य शासनाच्या कृषी विभागाने नुकसानग्रस्त भातशेतीचे पंचनामा करावा अशा सूचना उपाध्यक्ष तथा कृषी सभापती रणजित देसाई यांनी अधिका-यांना दिल्या.शेतक-यांना नुकसान भरपाई मिळावी असा ठरावही सभागृहात घेण्यात आला.जिल्हा परिषद कृषी समितीची मासिक सभा उपाध्यक्ष तथा समिती सभापती रणजित देसाई यांच्या अध्यक्षतेखाली येथील बॅ नाथ पै सभागृहात पार पडली.यावेळी समिती सचिव तथा कृषी विकास अधिकारी सुधीर चव्हाण, सदस्य महेंद्र चव्हाण, संजना सावंत, समिधा नाईक, वर्षा पवार, गणेश राणे, संजय देसाई, सुधीर नकाशे अधिकारी, खातेप्रमुख उपस्थित होते.जिल्ह्यात सप्टेंबर महिना कोरडा गेल्याने भरड शेतीला पाण्याअभावी फटका बसला आहे. तर गेले आठ दिवस परतीच्या पावसाने शेतीची दाणादाण उडवली असून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
एकतर यावर्षी भातपिकाचे उत्पन्न अतिषय नगण्य मिळणार असतानाच परतीच्या पावसामुळे त्यात आणखीन घट होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. यापार्श्वभुमीवर या शेतक-यांना प्रशासनाकडून नुकसान भरपाई मिळणे आवश्यक आहे.अशी सविस्तर चर्चा आजच्या बैठकीत करण्यात आली.राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या कामकाजावर नाराजराज्य शासनाच्या कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी सत्यवान परब यांनी अर्ज केला होता. मात्र त्यांचा अर्ज कार्यालयातून गहाळ झाला. याला कृषी अधीक्षक विभाग जबाबदार असून परब नामक लाभार्थ्यांना तत्काळ योजनेचा लाभ द्यावा अशी मागील सभेत सुचना करून सुद्धा एक महिना झाला तरी या विभागाने त्यावर कोणतीही कार्यवाही केलेली नाही .यावरून समिती सदस्य संजय देसाई व सुधीर नकाशे यांनी कृषी अधीक्षक विभागावर आरोप करीत अधिका-यांना धारेवर धरले.