वैभववाडी : कुंभवडेतील सोंगी ढोलपथक, वारकरी दिंडी, सजविलेल्या बैलगाड्या, पारंपरिक वेशभूषेतील महिला, बालके व भगव्या झेंड्यासह असंख्य नागरिकांच्या सहभागाने वैभववाडी लोकोत्सवानिमित्त निघालेल्या शोभायात्रेने नववर्षाचे जल्लोषी स्वागत झाले. त्यानंतर भैरी भवानी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अतुल रावराणे व उपनगराध्यक्षा संपदा राणे यांच्या हस्ते रविवारी वैभववाडी लोकोत्सवाचे शानदार उद्घाटन पार पडले.शहरातील दत्तमंदिर समोर प्रतिष्ठित नागरिक दादा रावराणे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून सायंकाळी ५.३० वाजता शोभायात्रेला प्रारंभ झाला. हनुमान, संकासूर, गणपती आदी पात्रे साकारलेल्या कुंभवडेतील सोंगी ढोलपथक लक्षवेधी ठरले. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज, येसूबाई, बाल शिवाजी यांसारखी रुपे बालकांनी शोभायात्रेत साकारली.
तसेच खांबाळेतील वारकरी दिंडी, शेर्पेतील ढोलपथक, सोनाळी, एडगाव येथील आकर्षक पद्धतीने सजविलेल्या बैलगाड्यांसह पारंपरिक वेशभूषेतील महिला व नागरिकांनी शोभायात्रेला वेगळीच रंगत आणली. त्यामुळे नववर्ष स्वागताच्या शोभायात्रेत आबालवृद्धांचा उत्साह ओसंडून वाहताना दिसला.दत्तमंदिरापासून निघालेली शोभायात्रा संभाजी चौकातून फिरून दीड तासाने लोकोत्सवाच्या उद्घाटनस्थळी पोहोचली. या शोभायात्रेत सभापती लक्ष्मण रावराणे, नगरसेवक संजय सावंत, भाजपचे प्रमोद रावराणे, राजेंद्र राणे, बंड्या मांजरेकर, व्यापारी मंडळाचे अध्यक्ष मनोज सावंत, रमेश तावडे, शिवाजी राणे, रत्नाकर कदम, अविनाश साळुंखे, तेजस आंबेकर आदी सहभागी झाले होते.लोकोत्सवाचे दीपप्रज्वलन अतुल रावराणे यांनी केले. तर उपनगराध्यक्षा संपदा राणे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून उद्घाटन करण्यात आले. यावेळी जयेंद्र रावराणे, बंडू मुंडल्ये, नगरसेवक सज्जन रावराणे, संतोष माईणकर, संतोष पवार, रोहन रावराणे, अक्षता जैतापकर, सुप्रिया तांबे, दीपक माईणकर, संदेश सावंत, सुनील रावराणे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष दत्तात्रय माईणकर, रणजित तावडे, राकेश कुडतरकर, संतोष टक्के, अमेय पोरे आदी उपस्थित होते.यावेळी अतुल रावराणे म्हणाले की, समाजातील सर्व घटकांना एकत्र आणण्याचे काम लोकोत्सवासारख्या कार्यक्रमातून होत असते. हेच काम दत्तकृपा प्रतिष्ठान करीत आहे. हा लोकोत्सव फक्त वैभववाडीपुरता राहिलेला नसून संपूर्ण तालुक्याचा झाला आहे. हा कार्यक्रम अशाच पद्धतीने बहरत रहावा यासाठी नागरिकांनी प्रतिष्ठानच्या पाठीशी रहावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.