वेंगुर्ले : परिवर्तन घडण्यासाठी आगामी पाच वर्षे स्वाभिमान पक्षाला संधी द्या, असे आवाहन माजी मुख्यमंत्री तथा स्वाभिमान पक्षाचे संस्थापक खासदार नारायण राणे यांनी वेंगुर्ले येथील कार्यकर्ता मेळाव्यात केले.
मासेमारी, पर्यटन आणि रेडी बंदर यामुळे वेंगुर्ले तालुक्याचा विकास होऊ शकतो आणि त्यामुळे तालुक्यात आर्थिक सुबत्ता येईल. गेल्या काही वर्षात जिल्हा मागे राहिला आहे. पैशाच्या आमिषाला बळी पडू नका. स्वाभिमान पक्ष हा जिल्ह्यापुरता मर्यादित नसून तो संपूर्ण महाराष्ट्रात आहे. मतदारांना तेल देऊन आम्ही मते मागत नाही, तर विकास करुनच मते मागतो.वेंगुर्लेतील साईदरबार सभागृहात स्वाभिमान पक्षाचा कार्यकर्ता मेळावा व सभासद नोंदणी कार्यक्रम खासदार राणे यांच्या उपस्थितीत झाला.
यावेळी माजी खासदार निलेश राणे, पक्षाचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, महिला जिल्हाध्यक्षा प्रणिता पाताडे, संदीप कुडतरकर, जिल्हा परिषद आरोग्य व शिक्षण सभापती प्रितेश राऊळ, विकास कुडाळकर, तालुकाध्यक्ष मनीष दळवी, दीपक नारकर, प्रज्ञा परब, सारिका काळसेकर, दादा कुबल, समिधा नाईक, पूजा कर्पे, निकिता परब, गौरी पाटील, वंदना किनळेकर, सुनील भोगटे, प्रकाश गडेकर, दाजी परब, बाबली वायंगणकर, वसंत तांडेल उपस्थित होते.यावेळी राणे यांनी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यावर तोफ डागली. ते म्हणाले, गृहराज्यमंत्री आपला पालकमंत्री असताना जिल्ह्यात चोऱ्या, मारामाऱ्या, घरफोड्या होतात ही शोकांतिका आहे. रेडी बंदर सुरु करण्यासाठी मी प्रयत्न केले, मात्र ते बंदर बंद करायला पालकमंत्री केसरकर पुढे सरसावले. पण आता ते बंदर लवकरच सुरु होणार आहे.
मी मुख्यमंत्री असताना सिंधुदुर्ग जिल्हा टँकरमुक्त केला होता. आता याच जिल्ह्यात टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. आपल्या कार्यकाळातले रस्ते आणि आताचे रस्ते पहा. आता प्रवास करताना रस्त्यावर आहोत की होडीत आहोत तेच समजत नाही अशी महामार्गाची अवस्था झाल्याची टीका त्यांनी केली.
यावेळी संदीप कुडतरकर, दत्ता सामंत, प्रणिता पाताडे, विकास कुडाळकर यांनीही मनोगते व्यक्त केली. सूत्रसंचालन व आभार काका सावंत यांनी मानले.