सिंधुदुर्गनगरी : सुकळवाड सावंतवाडा येथील लवू सावंत (४०) या तरुणास ओहोळातील तुडुंब पाण्यात वाहत असताना तेथील ललित पाताडे या धाडसी युवकाने आपल्या सहकारी मित्रांसोबत पुरातून बाहेर काढून जीवदान दिले. त्यांच्या या धैर्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.लवू सावंत हे गेले काही दिवस घरातून बेपत्ता होते. ८ जुलैला जिल्ह्यात अतिवृष्टीदरम्यान नदीनाले दुथडी भरून वाहत होते. यादिवशी दुपारी ३ च्या दरम्यान सुकळवाड नदी पुलानजीक झाडीचा आधार घेऊन सावंत पुरातील पाण्यात होते. शेतात काम करणाऱ्या महिलांना ते नजरेस पडताच त्यांनी आरडाओरड केली.
लगेचच ललित पाताडे यांनी आदेश पाताडे, संदीप चव्हाण, लक्ष्मण काळसेकर या युवकांना सोबत घेत काही अंतर पाण्यात उतरून काठी व दोरीच्या सहाय्याने सावंत यांना काठावर आणून जीवदान दिले.सावंत यांच्या एका कानाच्या बाजूला जखम झाल्याचे आढळून आली. रुग्णवाहिकेने त्यांना जिल्हा रुग्णालयात हलविण्यासाठी सुकळवाड उपसरपंच स्वप्नील गावडे, भाई राणे, सुभाष टेंबुलकर, सुभाष म्हसकर आदींनी सहकार्य केले.