बांदा : इन्सुली नळपाणी योजनेकडील वीजपुरवठा गेले दोन दिवस बंद असल्याने पाण्याअभावी ग्रामस्थांचे हाल झाले आहेत. ऐन उन्हाळ्याच्या काळात वीज वितरण जाणूनबुजून वेळ काढत असल्याचा आरोप करीत बिलेवाडी ग्रामस्थांनी इन्सुली सबस्टेशन कार्यालयावर धडक देत तालुुका अभियंता अमोज राजे व बांदा सहाय्यक अभियंता सुभाष आपटेकर यांना कार्यालयातच कोंडून ठेवले.बिलेवाडीसाठी स्वतंत्र वीज रोहित्राची मागणी करीत अभियंत्यांना तब्बल रात्री १२ वाजेपर्र्यंंत कोंडून ठेवण्यात आले. अखेर ग्रामस्थांच्या ताठर भूमिकेपुढे नमते घेत वीज वितरण कंपनीला रात्री उशीरा वीज रोहित्र आणावे लागले.यावेळी संतप्त स्थानिक ग्रामस्थांनी अभियंता सुभाष आपटेकर यांना चांगलेच धारेवर धरले. वाडीतील वीज समस्या तत्काळ मार्गी लावण्याचे लेखी आश्वासन अमोल राजे यांनी ग्रामस्थांना दिल्यानंतर घेराओ रात्री उशिरा मागे घेण्यात आला. इन्सुुली बिलेवाडी येथे गेले काही दिवस विजेचा लपंडाव सुरू आहे.या वाडीत सुमारे २०० हून अधिक वीज ग्राहक आहेत. शेतकऱ्यांचे शेती पंपही या परिसरात मोठ्या प्रमाणात आहेत. या परिसरात उन्हाळी शेतीही अखेरच्या टप्प्यात असून विजेच्या लपंडावामुळे शेतकरी पूर्णपणे त्रस्त झाले आहेत.
ग्रामपंचायतीची नळपाणी योजनाही याच परिसरात असून वीज रोहित्रामध्ये बिघाड झाल्याने नळपाणी योजना गेले दोन दिवस बंद आहे. वीज नसल्याने नळपाणी योजना बंद आहे. त्यामुळे स्थानिकांचे पाण्याअभावी हाल झाले आहेत.रोहित्राच्या दुरुस्तीबाबत वीज वितरण कंपनीने चालढकल केल्याने संतप्त झालेल्या ६० ते ७० बिलेवाडी ग्रामस्थांनी शनिवारी सायंकाळी ७ वाजता इन्सुली सबस्टेशन कार्यालय गाठत तेथील कर्मचाऱ्यांना जाब विचारला.तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांना याठिकाणी बोलवा अशी मागणी केली. रात्री उशिरा तालुका अभियंता अमोल राजे व सहाय्यक अभियंता सुभाष आपटेकर हे याठिकाणी आले असता त्यांना स्थानिकांनी चांगलेच धारेवर धरले.यावेळी उपसरपंच सदा राणे, माजी उपसरपंच कृष्णा सावंत, सोसायटी चेअरमन काका चराटकर, हरी तारी, अमित सावंत, प्रवीण सावंत, गंगाराम कोठावळे, बाजी सावंत, संतोष मांजरेकर, बंटी सावंत, नरेंद्र सावंत, सुरेश शिंदे, नाना गावडे, रामू तारी, संदीप सावंत, उमेश कोठावळे, फॅलिक्स फर्नांडिस, प्रदीप सावंत, शिवा गावडे, अर्जुन गावडे, अजित गावडे, रवी कोठावळे, आपा कोठावळे, विश्वास सावंत, बापू सावंत आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थ झाले शांतरविवारी सकाळपर्यंत वीजपुरवठा सुरू करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले. मात्र आताच्या आता वीज रोहित्र आणून वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी स्थानिकांनी केली. तसेच अधिकाऱ्यांना कोंडून ठेवण्याचा इशारा दिला. ग्रामस्थांच्या आक्रमक भूमिकेमुळे रात्री १२ वाजता वीज रोहित्र आणून बसविण्यात आले. त्यानंतर उशिरा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला.