मालवण : मालवणात पर्यटकांकडून स्थानिकांना मारहाण झाल्याच्या दोन घटना घडल्या. तारकर्ली व किल्ले सिंधुदुर्ग या ठिकाणी झालेल्या या मारहाणीबाबत रात्री उशिरापर्यंत तक्रार नोंद करण्याची कार्यवाही पोलीस ठाण्यात सुरू होती.तारकर्ली रांजेश्वर मंदिरासमोरील पार्किंग परिसरातील स्वच्छतागृहात एक पर्यटक महिला गेली असताना एका स्थानिक महिलेने स्वच्छतागृहाचा दरवाजा उघडल्याच्या रागातून त्या पर्यटक महिलेच्या पतीने त्या स्थानिक महिलेला मारहाण केल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली.
ही मारहाण सोडविण्यास गेलेल्या स्थानिक हॉटेल व्यावसायिक महिला व इतर पर्यटकांनादेखील त्या पर्यटकाने मारहाण करीत एका दुकानातील बरण्या फोडून नुकसान केले. हे प्रकरण सायंकाळी उशिरा मालवण पोलीस स्थानकात पोहोचल्यानंतर याबाबतची कार्यवाही रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
तारकर्ली येथे पर्यटकांनी एका हॉटेलचे केलेले नुकसान
तारकर्ली एमटीडीसीच्यानजीक रांजेश्वर मंदिरासमोरील जागेत गाड्या पार्किंगची व्यवस्था आहे. या पार्किंग जागेतच एक दुकान व स्वच्छतागृहाची व्यवस्था आहे. मालवण तालुक्यातील माळगाव येथे आपल्या नातेवाईकांकडे आलेले मुंबईचे पर्यटक तारकर्ली येथे बुधवारी पर्यटनासाठी आले होते.
सायंकाळी या पर्यटकांमधील एक महिला पार्किंगच्या जागेतील स्वच्छतागृहात गेली होती. दरम्यान, याचवेळी एका स्थानिक महिलेने स्वच्छतागृहाचा दरवाजा उघडला. त्या रागातून त्या पर्यटक महिलेच्या पतीने व अन्य नातेवाईकांनी दरवाजा उघडणाऱ्या स्थानिक महिलेला मारहाण करण्यास सुरुवात केली.
यावेळी त्याठिकाणी आलेल्या अन्य दोघा स्थानिक महिलांनाही मारहाण करण्यात आली. तसेच त्या स्थानिक महिलेच्या हॉटेलमधील बरण्या व अन्य साहित्य फोडून नुकसान करण्यात आले. याबाबत हॉटेल व्यावसायिक व सामाजिक कार्यकर्त्या पूनम चव्हाण यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.कर्मचाऱ्यास मारलेपर्यटन कर मागितल्याच्या कारणावरून सिंधुदुर्ग किल्ल्यात वायरी-भूतनाथ ग्रामपंचायतीमार्फत पर्यटन कर वसूल करणाऱ्या हेमंत वराडकर या कर्मचाऱ्यांला पर्यटकांनी मारहाण केल्याची घटना बुधवारी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास घडली. ही मारहाण सोडविण्यास गेलेल्या कर्मचाऱ्याचे सहकारी मानसी संतोष सावंत व गजानन रोगे यांनाही पर्यटकांनी धक्काबुक्की केली. याबाबत रात्री उशिरापर्यंत मालवण पोलीस स्थानकात तक्रार नोंदविणे व गुन्हा दाखल करण्याबाबत कार्यवाही सुरू होती.